पणजी, १९ मार्च (वार्ता.)- गोव्यातून म्हादई नदीची पहाणी करण्यासाठी कळसा येथे गेलेले जलस्रोत खात्याचे अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांच्या पथकाला कर्नाटक पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याशी बोलतांना पोलिसांनी असभ्य भाषा वापरली, तसेच त्यांना त्या क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला. कर्नाटक पोलिसांनी बलपूर्वक या पथकातील अधिकार्यांची ओळखपत्रे काढून घेतली. त्यानंतर या पथकाने वाद घातल्यानंतर ओळखपत्रे परत देण्यात आली. कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बी.एस्. येडीयुरप्पा यांनी चोर्ला घाटापासून ते कळसा येथील म्हादई प्रकल्पापर्यंत पोलिसांना पहारा ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांतील ३ अभियंत्यांच्या पथकाने कळसा भंडुरा प्रकल्पाचे निरीक्षण करून त्याविषयीचा आढावा घेतला आहे. कर्नाटक राज्याने अवैधपणे म्हादईचे पाणी वळवले आहे, अशा आशयाची याचिका गोवा राज्याने सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही राज्यांच्या निरीक्षक अभियंत्यांनी कळसा-भंडुरा प्रकल्पाची पहाणी करून अहवाल सादर करावा, असा आदेश दिला आहे.