आपत्काळात साधकांसाठी मार्गदर्शक सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. साधकांनी एकमेकांकडून शिकून त्याप्रमाणे कृती करणे आवश्यक !

भगवंत प्रत्येक जिवाला कसा घडवतो, ते आपल्याला शिकता येते. प्रत्येकात अनंत गुण आहेत. आपण जर देवाच्या चरणी गुण अर्पण केले, तर प्रगती होणारच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णुस्वरूप असून त्यांनी ‘गुरुकृपायोग’ निर्माण केला. देवाला एक एक गुण अर्पण करणे, म्हणजे जे देवाने दिले, ते त्याला अर्पण करणे आणि दोषांचे निर्मूलन करणे होय. परात्पर गुरुदेवांना साधकांनी एकमेकांकडून शिकणे अपेक्षित आहे. त्यातून गुण आत्मसात करून कृती करायला हवी. साधकांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करून मन शुद्ध, स्वच्छ आणि निर्मळ केले, तर त्यातून भक्ती वाढण्यासाठी साहाय्य होऊन देवाचे बळ मिळेल. ‘आपत्काळात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणार्‍या साधकांचे पीक येणार’, असा गुरूंचा संकल्प झालेलाच आहे. गुरूंचा हा संकल्प साधना करणार्‍या प्रत्येक जिवासाठी कार्यरत झाला आहे. त्यामुळे निर्धार करून साधना कृतीत आणण्याचा प्रयत्न करूया.

२. आपत्काळाच्या दृष्टीने मनाची सिद्धता असणे महत्त्वाचे !

प्रत्येकाने भावभक्तीसह कर्म केले, तर भक्तीचा प्रवाह वाढतो आणि भक्ती वाढली की, मनाची सिद्धता होते. त्यामुळे चिंता दूर होते. भक्ती हीच शक्ती आहे आणि भक्तीतच शक्ती आहे. आपत्काळाच्या दृष्टीने मनाची सिद्धता असेल, तर स्थुलातूनही सिद्धता होऊ शकते. मनात द्वंद असेल, तर श्रद्धा काम करत नाही. मनाची श्रद्धा दृढ असेल, तर सर्वकाही होते. आपत्काळाची सिद्धता करण्यासाठी आपण साधकांचे शरीर सुदृढ रहाण्यासाठी व्यायाम शिकवतो. देहाची काळजी घेण्यासह साधनेसाठी प्रत्येक क्षण वापरायला हवा आणि साधना वाढवून पुढे जायला हवे. साधकाची साधना वाढली की, पुढे स्थिरता येते.

‘देव आपल्यासाठी किती करतो’, याकडे लक्ष देणे, हा कृतज्ञतेचा भाग झाला. तोच आपल्याला वाढवायला हवा. संपतकाळामध्ये आवडीनुसार शिकणे योग्य होते; पण आपत्काळामध्ये जे जे शिकणे आवश्यक आहे, ती प्रत्येक गोष्ट आवडीने शिकायची आहे. काही जणांना साधना करायची असते; पण संघर्ष नको असतो. असे असले, तरी संघर्षाविना साधना शक्य नाही.

३. आपत्काळात स्वेच्छेपेक्षा साधना होणे आवश्यक !

आपत्काळात देवाने रक्षण करावे, अशी स्वेच्छा नको; पण ‘त्यात माझी साधना होत आहे का ?’, ते पहायला हवे. आपल्या हातात साधनेच्या दृष्टीने जे प्रयत्न करणे शक्य आहे, ते करूया. साधना ही अंतर्मनाची असून तिला कुणी विरोध करू शकत नाही. उदा. संत जनाबाई यांनाही साधना करण्यास विरोध झाला; पण त्यांची अंतर्मनातून साधना चालू होती. तसेच प्रत्येकाची साधना ही त्याच्या प्रकृतीनुरूप वेगळी असते. ‘घरच्यांनी साधना करावी’, हीदेखील स्वेच्छा नको. ‘त्यांनी किती साधना करायची’, याचा आपण अभ्यास करून त्यांना तारतम्याने आणि निरपेक्षपणे साधना सांगायला हवी. आपल्याला साधनेत प्रश्‍न पडत असतात; पण त्या प्रश्‍नांची उत्तरे तेव्हाच मिळतात, असे नाही, तर वेळ आली की, देव उत्तरे देतच असतो. कधी ती अनुभूतीतून वा अन्य मार्गाने देतच असतो. आपण स्वकोषात असतो, तेव्हा ‘मी’ आणि ‘माझे’ अशा संकुचित विचारात असतो; पण जेव्हा आपण समष्टीचा विचार करतो, तेव्हा व्यापकतेमुळेही वातावरणातही चांगला पालट जाणवतो.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (७.१०.२०२०)