श्री जगन्नाथ मंदिराची ३५ सहस्र एकर भूमी विकण्याचे वृत्त पूर्णतः चुकीचे ! – मंदिर प्रशासनाचे स्पष्टीकरण

पुरी (ओडिशा) – येथील प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराची ३५ सहस्र एकर भूमी विकण्यात येण्याच्या वृत्तावर मंदिर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. त्याने म्हटले आहे की, भूमी विकण्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. प्रसारमाध्यमांनी याला चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केले आहे.

श्री जगन्नाथ मंदिर कार्यालयाने ट्वीट करून म्हटले आहे की, मंदिराची ही भूमी अनेक काळापासून वेगवेगळ्या लोकांच्या नियंत्रणात आहे. ती परत मिळवण्यासाठी वर्ष २००३ मध्ये धोरण आखण्यात आले आहे. त्या अंतर्गत ही भूमी नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या धोरणाचा उद्देश मंदिराच्या भूमीचे रक्षण करणे हा आहे.

वर्ष २००१ ते २०१० पर्यंत २९२ एकर भूमी इतरांच्या कह्यातून सोडवण्यात आली आहे, तर वर्ष २०११ ते २०२१ पर्यंत ९६ एकर भूमी सोडवण्यात आली. या भूमीचा उपयोग जनतेसाठी करण्यात आला आहे. यात शाळा, वैद्यकीय महाविद्यालय, रस्ते बांधणे या गोष्टींचा समावेश आहे.