‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी व्यष्टी साधनेच्या आढावा गटात चिंतन करण्यासाठी आम्हाला काही विषय दिले. नंतर व्यष्टी आढाव्यात मी केलेले चिंतन वाचून दाखवले. ते पुढीलप्रमाणे…
गृहपाठरूपी चिंतन १
‘विदेशात साधनेसाठी प्रतिकूल स्थिती आहे; मात्र भारतात साधनेसाठी अनुकूल स्थिती आहे. अडचण काहीच नाही, तर मग साधना करण्यास अडचण काय आहे ?
१. स्वतःचे चिंतन
१ अ. साधनेसाठी कुणाचाही आणि कसलाही विरोध नसतांना स्वभावदोषांच्या अडथळ्यांमुळे साधना होत नसल्याचे लक्षात येणे : भारतात साधना करण्यासाठी अनुकूल स्थिती असूनही मी साधना नीट करत नाही; कारण माझे स्वभावदोष साधनेच्या आड येत आहेत. ते दूर करण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होत नाहीत. मी गांभीर्याने साधना करत नाही. मला कुणाकडूनही विरोध नाही आणि माझी शारीरिक स्थिती चांगली आहे. मी तरुण आहे, तरी माझ्याकडून झोकून देऊन सेवा होत नाही; कारण माझ्यामध्ये ‘आळस, भाव नसणे, गुरुकार्याची तळमळ अल्प असणे, ऐकण्याची स्थिती नसणे’, असे तीव्र स्वभावदोष आहेत. माझ्यातील अल्पसंतुष्टतेमुळे ‘साधनेत पुढे जायचे आहे’, असे मला वाटत नाही.
१ आ. ‘कृतज्ञताभाव नसणे, शरणागतभाव नसणे आणि स्वतःतील स्वभावदोष’ या कारणांमुळे साधनेची गती वाढत नसल्याचे लक्षात येणे : ‘मला श्री गुरूंच्या आश्रमात रहायला मिळत आहे’, याविषयी कृतज्ञता वाटत नाही. माझ्यात शरणागतभाव नाही. मी देवाला शरण जाऊन आळवत नाही. शरणागती पत्करून अहं न्यून करण्यासाठी मी क्षमायाचना करत नाही. त्यामुळे माझा अहं अल्प होत नाही. ‘अहं ठेचून काढला पाहिजे’, हे ठाऊक असूनही तो अल्प होण्याऐवजी माझा अहं वाढतच आहे. ‘कळते; पण वळत नाही’, या म्हणीप्रमाणे माझ्या साधनेची स्थिती आहे. माझी साधना न होण्यात माझे स्वभावदोष आड येतात. ‘ते दूर करण्यासाठी मी प्रयत्न केले, तर अडचण सुटेल’, हे माझ्या लक्षात आले.
गृहपाठरूपी चिंतन २
‘प्रतिकूल परिस्थिती आहे, म्हणजे परिस्थिती चांगली नाही. आपत्काळ आहे, तर आपण काय केले पाहिजे ?
२. स्वतःचे चिंतन
‘संधीकाळात सद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा लाभ करून घेऊन साधनेच्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे’, असे लक्षात येणे : ‘हा आपत्काळ आहे; मात्र साधकांसाठी सुवर्णसंधीकाळ आहे. या काळात केलेल्या साधनेचे फळ सहस्र पटींनी मिळणार आहे. परात्पर गुरु डॉक्टरांसारखे मोक्षगुरु आपल्याला लाभले आहेत. प्रत्यक्ष सद्गुरुच साधनेचा आढावा घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सकारात्मक राहून करून घेतला पाहिजे. साधनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे’, असे मला वाटले.
कृतज्ञता
मी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी कृतज्ञ आहे. त्यांनी माझा व्यष्टी साधनेचा आढावा घेऊन मला चिंतन करायला शिकवले. ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे मला आढावासेवक म्हणून लाभले’, यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
– कु. महानंदा गिरिधर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (४.५.२०२०)