मेगन मर्केल यांच्या आरोपांवर कुटुंब खासगीत चर्चा करील ! – ब्रिटीश राजघराणे 

लंडन – ब्रिटीश राजघराण्याची धाकटी सून मेगन मार्केल हिने एका मुलाखतीमध्ये राजघराण्याविषयी केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्याला ब्रिटनची राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी उत्तर दिले असून प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्याविषयी चिंता आणि सहानुभूती व्यक्त करत ‘कुटुंब खासगीत यासंबंधी चर्चा करील’ असे म्हटले आहे. पती प्रिन्स हॅरीसोबत ओपरा विन्फ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत मेगन मार्केल हिने ‘राजघराण्याला माझ्या बाळाचा रंग काय असेल, याची चिंता होती’, असे म्हटले होते. तसेच ‘राजघराण्यात असतांना माझ्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते’, असा दावा केला होता.

ब्रिटनच्या राणीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, मागील काही वर्षे हॅरी आणि मेगन यांच्यासाठी कितपत आव्हानात्मक होती हे समजल्यावर कुटुंब दुःखी आहे. जी सूत्रे उपस्थित करण्यात आली आणि त्यातही विशेषकरून बाळाच्या रंगाचे सूत्र हे अतिशय चिंता निर्माण करणारे आहे. काही गोष्टींमध्ये मतांतर असू शकते; पण हे सर्व गांभीर्याने घेण्यात आले असून कुटुंब खासगीत यासंबंधी चर्चा करील’, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ‘हॅरी, मेगन आणि आर्ची हे नेहमीच कुटुंबातील प्रिय सदस्य असतील’, असेही यात नमूद करण्यात आले आहे.