नाविन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘प्रत्येक वर्षी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात कार्तिक मासात साधारणपणे ९, १० आणि ११ नोव्हेंबर असे तीन दिवस, तसेच माघ मासात ३१ जानेवारी, १ अन् २ फेब्रुवारी असे तीन दिवस देवीचा किरणोत्सव साजरा होतो. वर्षभरात दोन वेळा केवळ या तीन दिवशी सूर्यप्रकाशाचे किरण मंदिराच्या गाभार्यात प्रत्यक्ष देवीच्या मूर्तीपर्यंत पोचतात. अशाच प्रकारची घटना देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातही घडली.
१. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडणे
कर्नाटक राज्यातील तुमकुरू या जिल्ह्यातील ‘चिक्कनायकनहळ्ळी’ गावातील मद्दरलक्कमा (श्री महालक्ष्मी) या देवीने तेथील पुजारी श्री. पवनकुमार यजमान यांच्या माध्यमातून १६.४.२०२० या दिवशी सांगितले, ‘सनातनच्या आश्रमांना सूर्यतत्त्व अल्प प्रमाणात प्राप्त होते. सनातनचे सर्व आश्रम, तसेच तेथील साधक, संत, सद्गुरु आणि परात्पर गुरु यांच्या रक्षणासाठी १६ दिवस सप्तशती पाठाचे पठण अन् गोपूजन करावे. त्याचसमवेत स्वयंपाक घरातील श्री अन्नपूर्णादेवीला नैवेद्य दाखवावा.’ देवीच्या आज्ञेनुसार १६.४.२०२० या दिवशी सप्तशतीचा पाठ आरंभ करण्यात आला. त्याच्या दुसर्याच दिवशी म्हणजे दिनांक १७.४.२०२० या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात सकाळी ८.०२ मिनिटांनी स्वयंपाकघरात असलेल्या श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडले. हे सूर्यकिरण १ मिनिट देवीच्या मूर्तीवर स्थिर होते. स्वयंपाकघरात अन्यत्र कुठेही सूर्यकिरण पडले नव्हते; केवळ देवीच्या मूर्तीवर होते. यापूर्वी सूर्याचे किरण देवीच्या या मूर्तीवर कधीच पडले नव्हते, तसेच त्यानंतरही पडलेले नाहीत.
२. श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडण्यामागील अध्यात्मशास्त्र
२ अ. सूर्याच्या तेजशक्तीच्या लहरींचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीला ज्या वेळी स्पर्श झाला, तेव्हा सूर्य हे तेजतत्त्वाचे प्रकट स्वरूप आणि श्री अन्नपूर्णादेवीची मूर्ती ही शक्तीचे कार्यरत स्वरूपातील सगुण तत्त्व असल्याचे जाणवले. सूर्याकडून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वाच्या लहरी आणि देवीतील कार्यरत शक्ती यांच्या संयोगातून निर्माण होणार्या तेजशक्तीच्या लहरींचा श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीला ज्या वेळी स्पर्श होतो, त्या वेळी मूर्तीतील तेजशक्ती (देवत्व) जागृत होते. त्या वेळी वातावरणात चैतन्य लहरींचे प्रक्षेपण होऊन किरणोत्सव होतो. अशा प्रकारे मूर्तीतील जागृत झालेले देवत्व आवश्यकतेनुसार विविध स्तरांवर कार्य करते.
२ आ. किरणोत्सवातून प्रक्षेपित होणार्या गतीमान तेजोलहरींनी वायूमंडलातील रज-तम नष्ट करून शुद्धी करणे : रज-तम यांच्या वाढत्या प्रदूषणामुळे वातावरण दूषित होत चालले आहे. किरणोत्सवातून प्रक्षेपित होणार्या गतीमान तेजलहरी वायूमंडलातील सूक्ष्मतर तेजरूपी रजतमात्मक लहरींचे विघटन घडवून आणतात. त्यामुळे दूषित वातावरणामुळे होणारे सूक्ष्म-परिणाम नष्ट होण्यास साहाय्य होते.
मद्दरलक्कमा (श्री महालक्ष्मी) या देवीच्या आज्ञेनुसार सनातनचे आश्रम, तसेच संत यांच्या रक्षणासाठी सप्तशतीचा पाठ आरंभ करताच, आश्रमाच्या स्वयंपाकघरातील श्री अन्नपूर्णादेवीच्या मूर्तीचा किरणोत्सव होणे, ही देवीने तिच्या कृपेची दिलेली प्रचीतीच होय !’
– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.६.२०२०)
सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |