पुण्यातील गुंडांच्या टोळ्यांवर पोलिसांची कारवाई !

पुण्यातील टोळी वर्चस्वावरून हत्येचा प्रयत्न करणार्‍या गुंड बंडू आंदेकरला अटक

गुन्हे आणि गुन्हे घडण्याचे प्रमाण अल्प होण्यासाठी कठोर शिस्तीची आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

सौजन्य -सकाळ

पुणे, ८ मार्च – येथील घायवळ टोळीचा म्होरक्या नीलेश बन्सीलाल घायवळ याला पोलिसांनी २ मार्चच्या रात्री विलंबाने जामखेड येथून कह्यात घेऊन पुण्यात आणले. पुढील १ वर्ष त्याला एम्.पी.डी.ए. अधिनियमान्वये येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. टोळीचे वर्चस्व अल्प करण्याचा प्रयत्न करतो म्हणून बंडू आंदेकर टोळीने एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी बंडू आंदेकरसह ५ जणांवर गुन्हा नोंद करून दोघांना अटक केली आहे. पुणे शहराच्या मध्यवस्तीत आंदेकर टोळीचे वर्चस्व आहे. कुडले आणि त्याचे साथीदार हे टोळीचे वर्चस्व अल्प करत आहेत. म्हणून त्यांनी कुडले याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

गणेश पेठेतील बांबू आळी येथे २१ फेब्रुवारीला रात्री ९ वाजता ही घटना घडली. आंदेकर याच्या सांगण्यावरून हे आक्रमण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार खडक पोलिसांनी २ मार्चला मध्यरात्री टोळीतील दोघांना अटक केली आहे. आंदेकर याच्यावर वर्ष १९८५ पासून हत्या, हत्येचा प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रेे बाळगणे, अपहरण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे फरासखाना, खडक आणि समर्थ या पोलीस ठाण्यांत नोंद आहेत. गेल्या मासात कात्रज-कोंढवा रस्त्यावर वैमनस्यातून विघ्नेश गोरे या युवकावर आंदेकर टोळीतील सराईतांनी गोळीबार केला होता.