विनाकारण वाहने अडवणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर कडक कारवाई केली जाईल ! – तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक

प्रतिकात्मक चित्र

सोलापूर – नाकाबंदी किंवा नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर कारवाई करण्यापूर्वी त्याची नोंद प्रथम पोलीस ठाण्याच्या दैनंदिनीत होऊन कंट्रोल रूमलाही कळवणे बंधनकारक असते. जिल्ह्यामध्ये विवाह, वारकरी दिंडी, दशविधी, धार्मिक कार्यक्रम यांसाठी जाणार्‍या वाहनांना विनाकारण अडवून त्रास देणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर कडक कारवाई केली जाणार आहे, अशी चेतावणी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली आहे. २ मार्च या दिवशी याविषयीचे आदेश त्यांनी काढले आहेत. (पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घेतलेला निर्णय योग्य असून असा निर्णय अन्य पोलीस अधिकार्‍यांनीही घ्यावा. – संपादक)

१. महामार्ग किंवा राज्यमार्ग येथे नाकाबंदी करण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांसह पोलीस मुख्यालयास त्याची माहिती देणे बंधनकारक आहे. नाकाबंदी चालू असतांना डमी वाहनचालक पाठवून पोलीस उपअधीक्षकांकडून कार्यवाहीची पडताळणी केली जाणार आहे.

२. नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर निश्‍चितपणे कारवाई करावी; मात्र अन्य वाहनांना अडवतांना अनुमती घ्यावी लागेल, असे स्पष्ट निर्देश पोलीस अधीक्षक सातपुते यांनी दिले आहेत.

३. विनाकारण वाहन अडवून कागदपत्रांची मागणी केली जाते. याविषयी काही ठिकाणी अपप्रकार घडल्याच्या घटनाही पहावयास मिळतात. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ नये, यादृष्टीने सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारांनी काम करावे, असे आवाहनही सातपुते यांनी या वेळी केले.

महामार्ग आणि राज्यमार्ग येथे सोलापूर ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार विनाकारण दुचाकी, चारचाकी किंवा परराज्यातील वाहने अडवून त्यांना त्रास देत असल्यास संबंधित वाहनचालकांनी ०२१७-२७३२००० आणि ०२१७ – २७३२००९ या क्रमांकांवर संपर्क करावा, तर ७२६४८८५९०१ आणि ७२६४८८५९०२ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर छायाचित्राद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे.