(म्हणे) ‘मोदी सरकार आल्यापासून भारतात लोकांना मिळणारे स्वतंत्र्य घटले !’ – अमेरिकेतील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’चा अहवाल

  • भारतातील धर्मांध, शहरी नक्षलवादी, जिहादी आतंकवादी यांना मिळणार्‍या ‘स्वातंत्र्या’त घट झाल्याची चिंता अमेरिकेतील संस्थांना लागल्याने ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचे अहवाल प्रसिद्ध करून भारताची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
  • अमेरिकेत वर्णद्वेषी आक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असतांना या अमेरिकी संस्थेने प्रथम तेथील लोकांच्या स्वातंत्र्याची काळजी घ्यावी. भारतात कुणाला किती स्वातंत्र्या द्यायचे, याची काळजी घ्यायला भारतीय समर्थ आहेत !

वॉशिंग्टन (अमेरिका) – येथील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’ने प्रकाशित केलेल्या वार्षिक अहवालामध्ये स्वातंत्र्याविषयी भारताला देण्यात आलेले गुण ७१ वरून न्यून करून ६७ करण्यात आले आहेत. जगातील २११ देशांमध्ये भारताचा क्रमांक ८८ वा आहे. यापूर्वी भारत या सूचीमध्ये ८३ व्या स्थानावर होता. म्हणजेच भारताची ५ स्थानांनी घसरण झाली आहे. नागरिकांना देण्यात आलेले हक्क आणि स्वातंत्र्य हे वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून नष्ट होत असल्याचा दावा ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’ने केला आहे. मुसलमानांवर होणारी आक्रमणे, देशद्रोहाच्या कायद्याचा होणारा वापर, सरकारने कोरोना परिस्थिती हाताळतांना केलेली दळणवळण बंदी या सर्व गोष्टींच्या पार्श्‍वभूमीवर भारतातील लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्याचे ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’ने म्हटले आहे. मोदी सरकार आल्यापासून भारतात लोकांना मिळणारे स्वतंत्र्य घटल्याचा या अहवालात उल्लेख आहे.

१. या अहवालात पुढे म्हटले आहे की, मोदी यांच्या हिंदु राष्ट्रवादी सरकारने मानवी हक्कासांठी लढणार्‍या संस्थांवर दबाव टाकला. वेगवगेळ्या विषयांचे जाणकार आणि पत्रकार यांना धमकावण्याचे प्रकार घडले. कट्टरतावाद्यांकडून होणार्‍या आक्रमणांंचे प्रमाण वाढले. यामध्ये झुंडबळी आणि मुसलमानांवर होणारे आक्रमण यांचाही समावेश आहे.

२. जगामध्ये सर्वाधिक स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून फिनलँड, नॉर्वे आणि स्विडन हे पहिल्या स्थानी आहेत, तर सर्वांत अल्प स्वातंत्र्य असलेल्या देशांमध्ये तिबेट आणि सीरिया यांचा समावेश आहे.