सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग !

शेतकर्‍यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार !

संग्रहित छायाचित्र

बाभूळगाव – उजनी धरण विद्युतगृहामधून प्रारंभी १ सहस्र ६०० क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून ६ सहस्र क्युसेक करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता रा.पो. मोरे, उजनी धरण व्यवस्थापन विभाग, भिमानगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनी धरणातून सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद आणि भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतींच्या पिण्याचे पाणी योजनांसाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सखल भागातील संबंधित नागरिकांनी योग्य ती दक्षता घेऊन पाटबंधारे विभागास सहकार्य करावे, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सध्या उजनी धरणातून सीना-माढा योजना ३३३ क्युसेक, दहिगाव १२० क्युसेक, बोगदा ८१० क्युसेक, कालवा २ सहस्र ९५० क्युसेक असा विसर्ग चालू आहे.

तूर्तास तरी भीमा नदीकाठच्या नागरिकांची चिंता मिटली असली, तरी उजनी धरणातील पाणी स्थिती पहाता आगामी काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. उजनी धरण पाणलोट झपाट्याने अल्प होत असल्याने शेतकर्‍यांची तारांबळ होत आहे.