छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान पट्टणकोडोली यांचे निवेदन
यळगुड (जिल्हा कोल्हापूर), ३ मार्च (वार्ता.) – श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक आणि कृषीपूरक सेवा संस्थेच्या केक, ब्रेड अशा बेकरी उत्पादनांवर, तसेच लस्सी आणि अन्य उत्पादनांच्या वेष्टनांवर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमानाचे चित्र मुद्रित केलेले आहे. या उत्पादनांचा वापर करून झाल्यावर ही उत्पादने कचर्यात, रस्त्यावर, तसेच अन्यत्र टाकली जातात. यामुळे श्री हनुमानाची विटंबना होते. अशी विटंबना झाल्यामुळे कोट्यवधी हनुमान भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. तरी आपल्या आस्थापनाच्या सर्व उत्पादनांवरील श्री हनुमानाचे चित्र त्वरित काढून टाकावे, या मागणीचे निवेदन छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान पट्टणकोडोली यांच्या वतीने श्री हनुमान सहकारी दूध व्यावसायिक व कृषीपूरक सेवा संस्थेचे श्री. संतोष गवळी यांना देण्यात आले. या वेळी श्री. गवळी यांनी ‘याविषयी लवकरच आम्ही निर्णय घेऊ’, असे आश्वासन दिले.
या वेळी छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान पट्टणकोडोलीचे सर्वश्री शिवानंद पणदे, महादेव इंगळे, शंकर कामान्ना, सुनील दळवे, सचिन नाईक, संकेत बिरांजे उपस्थित होते.