भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) २८ फेब्रुवारी या दिवशी अवकाशात ‘पी.एस्.एल्.व्ही. – सी ५१’ या वाहकाच्या माध्यमातून १९ उपग्रह प्रक्षेपित केले. यामध्ये ब्राझिलच्या ‘अॅमेझोनिया – १’ या उपग्रहाचा समावेश असून १८ व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये देशातील काही अभियांत्रिकी महाविद्यालये, अमेरिकेचे काही उपग्रह आणि अवकाश संशोधनाची आवड असणार्या मुलांनी बनवलेले उपग्रह यांचा समावेश आहे. इस्रोच्या या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिक दृष्टीने अन्य देशांतील उपग्रहांचे केलेले प्रक्षेपण ! अद्यापपर्यंत इस्रोने प्रक्षेपित केलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या ३४२ एवढी मोठी झाली आहे.
इस्रोच्या मोहिमांचे वैशिष्ट्य म्हणजे इतर देशांच्या तुलनेत अत्यंत अल्प व्ययात घेतल्या जाणार्या अवकाश मोहिमा ! ज्या अवकाश मोहिमा घेण्यासाठी नासासारख्या जगद्विख्यात संस्थेला काही अब्ज रुपये लागतात, त्याच मोहिमा इस्रोकडून काही कोट्यवधी रुपयांच्या व्ययामध्ये घेतल्या जातात. इस्रोने साध्य केलेल्या मंगळ मोहिमेत वाहक आणि ‘ग्राऊंड सेगमेंट’ यांचा एकत्रित व्यय केवळ ४५० कोटी रुपये होता. हा व्यय हॉलिवूडचा ‘ग्रॅव्हिटी’ हा चित्रपट आणि नासाच्या मावेन ऑर्बिटर यांच्यापेक्षाही पुष्कळ अल्प होता. नासाला मंगळ मोहिमेसाठी या व्यतिरिक्तही पुष्कळ व्यय करावा लागला आणि दीर्घकाळ प्रयत्न करावे लागले. इस्रोने पहिल्याच प्रयत्नात वर्ष २०१४ मध्ये ही मोहीम यशस्वी केली. तेव्हा भारत पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा जगातील पहिला देश ठरला. तेव्हापासून उपग्रहांचे स्वस्तात प्रक्षेपण करणारा भारत जगाचे लक्ष बनून राहिला. यापूर्वी इस्रोने १०४ उपग्रह वाहून नेऊन त्याचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले होते. यामध्ये अमेरिकेचे ९६ उपग्रह, तर इस्रायल, कजाकिस्तान, नेरदलँड, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिराती यांचा प्रत्येकी १ उपग्रह होता. एकाच वेळी एवढ्या संख्येत उपग्रहांचे प्रक्षेपण करणे हासुद्धा एक मोठा विश्वविक्रमच होता.
आणखी एक संस्था हवी
जगात नासा ही अमेरिकी अवकाश संशोधन संस्था, इस्रो ही भारतीय संस्था, तसेच रशिया, चीन इत्यादी देशांच्या सरकारी संस्था आहेत. खासगी अवकाश संशोधन आस्थापनामध्ये अमेरिकेतील इलॉन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ ही जगप्रसिद्ध आहे. या संस्थेनेही नासाचे उपग्रह आणि अन्य उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. तसेच अवकाशात भ्रमंतीसाठी हे आस्थापन वाहक उपलब्ध करून देते. अवकाशात व्यावसायिक दृष्टीने क्षेत्र या संस्थेने उपलब्ध करून दिले असले, तरी ते खर्चिक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अवकाश मोहिमा अल्प व्ययात करण्याचे कठीण काम भारताने करून दाखवले आहे. त्यामुळे भारताला या क्षेत्रात पुढाकार घेण्यासाठी आणि त्यातून देशाचे उत्पन्न वाढवण्याची मोठी संधी आहे. माहिती तंत्रज्ञान आणि संगणकीय प्रणाली या क्षेत्रांत भारत अनेक देशांची कामे करून देतो. त्यातून संगणकीय प्रणाली उद्योगात भारताने अमेरिका, इस्रायल यांच्या खालोखाल नाव आणि पैसा कमावला आहे. अवकाश मोहिमांच्या क्षेत्रातील भारताच्या कामगिरीचा आलेख नेहमी चढता राहिला आहे. याचा लाभ भारताने करून घेण्याची आवश्यकता आहे. अनेक देशांचे प्रकल्प भारताने हाती घ्यावेत. इस्रोमध्ये शासनकर्त्यांनी अधिकाधिक होतकरू, अवकाश संशोधनाची आवड असणारे यांना कामाची संधी उपलब्ध करून द्यावी. वाटल्यास इस्रोसारख्याच आणखी एका अशासकीय संस्थेची निर्मिती करून आणि तिला शासन नियंत्रणात ठेवून अनेक परदेशी प्रकल्प हातात घेऊन तंत्रज्ञान आणि आर्थिक अशा दोन्ही दृष्टीने प्रगतीपथावर जाता येईल. नरेंद्र मोदी यांचे सरकार या दृष्टीने विचार करून पावले टाकील, अशी अपेक्षा आहे.