‘१२.२.२०२१ या दिवसापासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. २८.२.२०२१ ते ६.३.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, शिशिरऋतू, माघ मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे.
(संदर्भ : दाते पंचांग)
२. शास्त्रार्थ
२ अ. गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा : माघ कृष्ण पक्ष प्रतिपदेला गुरुप्रतिपदा साजरी केली जाते. या दिवशी श्री गुरु दत्तात्रेयांची पूजा करतात. या दिवशी गाणगापूर क्षेत्री मोठा उत्सव साजरा करतात आणि त्या दिवशी यात्रा असते.
२ आ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १.३.२०२१ या दिवशी उत्तररात्री ५.४७ पासून २.३.२०२१ या दिवशी उत्तररात्री ३.०० पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १.३.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.१२ पासून उत्तररात्री ५.४७ पर्यंत विष्टी करण आहे, तसेच ४.३.२०२१ या दिवशी रात्री ९.५९ पासून ५.३.२०२१ या दिवशी सकाळी ८.५५ पर्यंत विष्टी करण आहे.
२ ई. अंगारक चतुर्थी : प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ‘संकष्ट चतुर्थी’ असे म्हणतात. मंगळवारी येणार्या चतुर्थी तिथीला ‘अंगारक योग’ होतो. ज्या दिवशी चंद्रोदय समयी चतुर्थी तिथी असते, त्या दिवशी संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात; कारण श्री गणपतीच्या या व्रतामध्ये चंद्रदर्शन होणे विशेष महत्त्वाचे आहे. २.३.२०२१ या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री ९.५१ आहे. या दिवशी श्री गणेश मंत्राचा जप करतात. अथर्वशीर्ष, श्री गणेश स्तोत्र, श्री गणेश अष्टोत्तरशत नामावली वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.
२ उ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. २.३.२०२१ या दिवशी मंगळवार असून उत्तररात्री ३.०० नंतर पंचमी तिथी असल्याने बुधवारी सूर्योदयापर्यंत ‘दग्ध योग’ आहे. ४.३.२०२१ या दिवशी गुरुवार असून सूर्योदयापासून सायंकाळी ९.५९ पर्यंत षष्ठी तिथी आहे. ५.३.२०२१ या दिवशी शुक्रवार असून सायंकाळी ७.५५ नंतर अष्टमी तिथी असल्याने शनिवारी सूर्योदयापर्यंत ‘दग्ध योग’ आहे.
टीप १ – ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयानंतर वार पालटतो. टीप २ – घबाड मुहूर्त, क्षयदिन, भद्रा (विष्टी करण), दग्ध योग, संकष्ट चतुर्थी, आणि कालाष्टमी तिथी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे. टीप ३ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत. १. हरिचिया दासा हरि दाही दिशा । भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ २. तुका म्हणे हरिच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’ |
– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२१.२.२०२१)