औदुंबर, कृष्णतुळस आणि रामतुळस यांच्यातून उत्तरोत्तर अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

वनस्पतींविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

​‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये राम आणि कृष्ण तत्त्वही आहे’, असे महर्षींनी सांगितले आहे. ‘राम आणि कृष्ण या दोन्ही तत्त्वांचा सनातनच्या साधकांना लाभ मिळावा, तसेच श्रीकृष्ण अन् श्रीराम या दोन्ही अवतारांचा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आशीर्वाद लाभावा’, यासाठी महर्षींनी रामतुळस आणि कृष्णतुळस यांची रोपे विधीवत् कुंडीत लावण्यास सांगितली होती. परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन सकाळी स्नान केल्यानंतर रामतुळस आणि कृष्णतुळस यांना पाणी घालून प्रदक्षिणा घालतात.

कृष्ण तुळस आणि राम तुळस
औदुंबर वृक्ष

​ऑगस्ट २०२० मध्ये कृष्णतुळशीच्या कुंडीत आपोआप औदुंबराचे रोप उगवल्याचे लक्षात आले. ८.१०.२०२० या दिवशी कृष्णतुळशीच्या कुंडीतून औदुंबराचे रोप वेगळे करून आश्रम परिसरात लावण्यात आले. औदुंबराचे रोप आणि दोन्ही तुळस यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण : औदुंबर, कृष्णतुळस आणि रामतुळस यांच्यातून उत्तरोत्तर अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

​या सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात –

१. ऑगस्ट २०२० मध्ये ‘औदुंबरासहित कृष्णतुळस’ आणि रामतुळस यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.

२. ऑक्टोबर २०२० मध्ये ‘औदुंबरासहित कृष्णतुळस’ आणि रामतुळस यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

३. ८.१०.२०२० या दिवशी कृष्णतुळशीच्या कुंडीतून औदुंबराचे रोप वेगळे काढल्यानंतर औदुंबरातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ १५.४७ मीटर आणि कृष्णतुळशीतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २०.१० मीटर होती.

४. औदुंबर, कृष्णतुळस आणि रामतुळस यांच्यातील सकारात्मक ऊर्जा उत्तरोत्तर अधिक आहे.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. तुळशीचे महत्त्व : तुळशीत श्रीविष्णुतत्त्व असते. तुळस सदैव देवतेचे तत्त्व प्रक्षेपित करत असल्यामुळे ती सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि पवित्र करते. (‘तुळशीचे झाड २४ घंटे प्राणवायू सोडते’, असे विज्ञानही सांगते.) वातावरणातील रज-तमाचा परिणाम प्रत्येक वस्तूवर होत असतो. तुळशीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक स्पंदनांमुळे वातावरणातील रज-तम नष्ट होते. थोडक्यात तुळस ही सात्त्विक वनस्पती असून तिच्यामुळे वातावरणाची सतत शुद्धी होते. त्यामुळे पूर्वी घराघरांत प्रवेशद्वारापाशी ‘तुळशी वृदांवन’ असायचे. घरातील स्त्रियां भक्तीभावाने तुळशीचे पूजन करून तिला नमस्कार अन् प्रार्थना करत. तसेच सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावत. आजच्या विज्ञानयुगातही ग्रामीण भागात ही परंपरा जोपासली जाते.

२ आ. औदुंबराचे महत्त्व : भारतीय संस्कृतीत काही वृक्षांना ‘देववृक्ष’ म्हणून संबोधले जाते. त्यामधील एक म्हणजे औदुंबर ! प्राचीन धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे की, औदुंबराच्या झाडामध्ये त्रिमूर्तींचे वास्तव्य असते. या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मा, मध्यभागात विष्णु आणि अग्रभागात शिव यांचे अस्तित्व असते. त्यामुळे ‘या झाडाची पूजा करावी’, असे सांगितले जाते. त्रिमूर्तींच्या अस्तित्वामुळे या झाडातून सातत्याने सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होत असतात.

२ इ. औदुंबर, कृष्णतुळस आणि रामतुळस यांच्यातून उत्तरोत्तर अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : कृष्णतुळशीमध्ये कृष्ण तत्त्व, रामतुळशीमध्ये राम तत्त्व आणि औदुंबरामध्ये ब्रह्मा, विष्णु अन् महेश (शिव) या त्रिदेवांचे संयुक्त तत्त्व (दत्त तत्त्व) आकृष्ट करून प्रक्षेपित करण्याची क्षमता आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन सकाळी स्नान केल्यानंतर कृष्णतुळस आणि रामतुळस यांना पाणी घालून प्रदक्षिणा घालतात. परात्पर गुरु डॉक्टर ही कृती अत्यंत भावपूर्ण करतात. परात्पर गुरु डॉक्टरांनी केलेल्या भावपूर्ण अर्चनेमुळे (पूजा केल्यामुळे) तुळशीतील देवतातत्त्व जागृत होऊन कार्यरत झाले आहे. सध्याचा काळ हा आपत्काळ आहे. सूक्ष्मातील देवासुर लढा अंतिम टप्प्याला पोचला आहे. सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्ती त्वेषाने परात्पर गुरु डॉक्टरांवर सूक्ष्मातून आक्रमणे करत आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांवर होणार्‍या आक्रमणांचे पडसाद ते पाणी घालत असलेल्या तुळशींवर उमटतात. त्यामुळे ज्या ज्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांवर होणार्‍या आक्रमणांमुळे त्यांची प्राणशक्ती पुष्कळ न्यून होते, त्या त्या वेळी तुळशीची पाने करपून जाणे किंवा ती सुकणे इत्यादी परिणाम दिसून आलेले आहेत. ‘ऑगस्ट २०२० मध्ये कृष्णतुळशीमध्ये आपोआप औदुंबराचे रोप उगवणे’, हे सूक्ष्मातील देवासुर संग्रामात (लढ्यात) साहाय्य करण्यास दत्त तत्त्व (ब्रह्मा, विष्णु अन् महेश या त्रिदेवांचे संयुक्त तत्त्व) कार्यरत झाल्याचे द्योतक आहे. तसेच ‘ऑक्टोबर २०२० मध्ये औदुंबर, कृष्णतुळस आणि रामतुळस यांच्यातून उत्तरोत्तर अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे आणि रामतुळशीतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सर्वाधिक असणे’, हे काळानुरूप दत्त, कृष्ण आणि राम ही देवतातत्त्वे कार्यरत असून राम तत्त्वाचे कार्य दिवसेंदिवस वाढत असल्याचे द्योतक आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (५.१२.२०२०)

ई-मेल : [email protected]

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक