मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बैठक घेऊन काँग्रेसकडून हरताळ !  

जनतेने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो. इतर ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रम घेतले म्हणून आयोजकांवर गुन्हे नोंद केले जात आहेत. मग काँग्रेसच्या नेत्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यावर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई का केली जात नाही ? गृहमंत्री याची नोंद घेतील का ?

मुंबई – २३ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्र काँग्रेस समितीकडून राज्य निवड मंडळ बैठक बोलावण्यात आली होती; मात्र या बैठकीत कोरोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडालेला पाहिला मिळाला. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावे, अशा प्रकारचे आवाहन जनतेसहित सर्व राजकीय पक्षांना केले होते. सध्या पक्ष वाढवण्यापेक्षा कोरोनाला थांबवणे आवश्यक आहे, यासाठी पक्षीय कार्यक्रम घेऊ नये, असे आवाहन करूनही काँग्रेसकडून नियोजित बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थित असलेले काँग्रेसचे मंत्री, आमदार आणि नेते यांच्यात कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पहायला मिळाले नाही.

याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, ‘‘हा सार्वजनिक कार्यक्रम नसून पक्षाची रणनीती ठरवण्याविषयी बैठक आहे. यात ५० लोकांवर एकालाही प्रवेश नसून कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात येत आहे.’’ मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःचे नियोजित दौरे आणि कार्यक्रम रहित केले आहेत. असे असतांना सरकारमधील मुख्य पक्षाकडून हरताळ फासला जात आहे, अशी परिस्थिती काँग्रेसच्या बैठकीतून दिसून येते.