भाजपची पाच मते फुटली
सांगली, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत भाजपची सत्ता असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी हे महापौरपदी विजयी झाले आहेत. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मते, तर भाजपचे महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली. भाजपमधील ७ सदस्यांपैकी ५ सदस्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना महापौरपदासाठी मतदान केले, तर दोन सदस्य अनुपस्थित राहिले. याचसमवेत उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेश पाटील यांची निवड झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका इतिहासात प्रथमच ही निवड ऑनलाईन पद्धतीने झाली.
सांगली महापालिकेच्या स्थापनेनंतर अडीच वर्षांपूर्वी प्रथमच सांगली महापालिकेत भाजपची सत्ता आली होती. सौ. संगिता खोत या पहिल्या महापौर झाल्या. यानंतर सौ. गीता सुतार यांनी भाजपच्या वतीने महापौरपदाचा कार्यकाळ पूर्ण केला. तिसर्यांदा महापौरपदी निवड होतांना मात्र भाजपला धक्का बसून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली महापालिकेत सत्तांतर घडवले.