इयत्ता ५ वी ते ८ वीपर्यंतच्या शाळा बंद
नागपूर – शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी सुरक्षिततेच्या कारणास्तव इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी दिली, तसेच नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगून प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करून शासनाच्या नियमांचे पालन न करणार्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणीही दिली.
‘इयत्ता ९ वी आणि १० वीच्या वर्गासाठी परीक्षा घेणे महत्त्वाचे असल्याने कोरोना नियमांचे पालन करत या परीक्षा घेण्यात याव्यात’, असे आदेश तिवारी यांनी शाळा आणि महाविद्यालये यांना दिले आहेत. शहरात ज्या खासगी शिकवण्यांमध्ये कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत, त्या शिकवण्या बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.