सहस्रो लोक विनामास्क फिरत असतील, तर दळणवळण बंदी टाळताच येणार नाही ! – आयुक्त इक्बालसिंह चहल 

मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस महत्त्वाचे प्रतिदिन सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्‍या २५ सहस्र लोकांकडून दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट

इक्बालसिंह चहल

मुंबई – सध्या सहस्रोंच्या संख्येने लोक विनामास्क बाहेर फिरत आहेत. असे असेल, तर दळणवळण बंदी टाळताच येणार नाही. आता दळणवळण बंदी होणार कि नाही ? हे लोकांनीच ठरवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सांगितले. ते योग्यच बोलले आहेत. लोकांनी शिस्त पाळायला हवी. मास्क वापरायला हवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. विवाह समारंभात लोकांनी गर्दी केली नाही, तर दळणवळण बंदीची वेळच येणार नाही. मुंबईसाठी पुढील ८ ते १५ दिवस फार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

या मुलाखतीत ते पुढे म्हणाले…

१. माझ्याकडे आलेल्या २ व्हिडिओंमध्ये एक व्हिडीओ चौपाटीवरील होता. तेथे सहस्रो लोक होते. काही जण विनामास्क फिरत होते. एका विवाहातील व्हिडिओमध्येही तसेच दृश्य होते. हा सगळा बेशिस्तपणा आहे. संबंधितांवर गुन्हा नोंद करून दंडही ठोठावला आहे. अनेक ठिकाणी पबवर धाडी टाकण्यात आल्या.

२. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे धोका आहे. नागरिकांनी शिस्त पाळली नाही. सहस्रो लोक विनामास्क फिरत आहेत. २१ फेब्रुवारी या दिवशी आम्ही १६ सहस्र ४०० लोकांकडून दंड वसूल केला. मागील ३ मासांत १६ लाख लोकांकडून दंड आकारला आहे. आता प्रतिदिन सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्‍या २५ सहस्र लोकांकडून दंड वसूल करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

३. महापालिकेने मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवले आहे. आतापर्यंत ३१ लाख ३३ सहस्र चाचण्या करण्यात आल्या आहेत.