श्रीक्षेत्र सज्जनगड येथे ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ व्हावे, ही शिवभक्तांची इच्छा !

सातारा, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी म्हणजे श्रीक्षेत्र सज्जनगड होय. श्रीक्षेत्र सज्जनगडावर श्रीसमर्थ रामदासस्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर त्यांचे सत्शिष्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्याची इच्छा शिवभक्तांमध्ये जागृत होते; मात्र गडावर ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ नसल्याने शिवभक्तांची निराशा होते. त्यामुळे श्रीक्षेत्र सज्जनगड येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु श्री समर्थ रामदासस्वामी यांचे ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ असावे, अशी इच्छा राजधानी सातारा येथील शिवभक्त व्यक्त करत आहेत.

श्री समर्थ रामदासस्वामी यांनी भारतभर भ्रमंती करून अनुमाने १ सहस्र १०० हून अधिक मठ स्थापन केले. मठांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याला पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी समाजाला बलोपासनेचा संदेश दिला. शिवछत्रपतींच्या सैन्यात युवकांनी भरती व्हावे, यासाठी युवकांमध्ये देव, देश अन् धर्म यांप्रती प्रेम, निष्ठा अन् त्याग यांची भावना निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्री समर्थ रामदासस्वामी यांना दिलेल्या काही वस्तूंचा ठेवा आजही श्रीक्षेत्र सज्जनगडावर असणार्‍या मठातील शेजघरात जतन करून ठेवला आहे. शिवछत्रपतींनी, तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि विविध सरदार यांनी वेळोवेळी गुरु श्री समर्थ रामदासस्वामी यांच्यासाठी श्रीक्षेत्र सज्जनगड येथे भेटी दिल्या असल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. समर्थांच्या महानिर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी श्रीक्षेत्र सज्जनगड येथील मंदिर बांधल्याचे पुरावेही उपलब्ध आहेत. स्वत:ची आणि कुटुंबियांची काळजी न करता सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक व्हावी यासाठी शिवप्रभूंनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हिंदवी स्वराज्यासाठी लाखो मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली. अशा हिमालयाची उंची गाठलेल्या शिवप्रभूंना वंदन करण्यासाठी श्रीक्षेत्र सज्जनगड येथे भव्य ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ व्हावे, अशी मागणी शिवभक्तांकडून होत आहे.

‘श्रीशिव-समर्थ स्मारका’साठी सर्वतोपरी सहकार्य करू ! – सु.ग. तथा बाळासाहेब स्वामी, समर्थ वंशज तथा अधिकारी स्वामी

‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ श्रीक्षेत्र सज्जनगड येथे झालेच पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे; मात्र त्यासाठी लागणार्‍या शासकीय अनुमत्या आणि जागेची उपलब्धता याविषयी अभ्यास झाला पाहिजे. तसेच शिव-समर्थ भक्तांनी यासाठी प्रबळ इच्छाशक्ती दाखवून हा विषय तडीस नेला पाहिजे. श्रीक्षेत्र सज्जनगड येथे भविष्यातील ‘श्रीशिव-समर्थ स्मारका’साठी श्री रामदासस्वामी संस्थानचे सर्वतोपरी सहकार्य राहील.

श्रीक्षेत्र सज्जनगड येथे ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ झालेच पाहिजे ! – राजू भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य

गडावर येणार्‍या शिवभक्तांना समर्थ रामदासस्वामी यांच्यासमवेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन झाले पाहिजे. तसेच छत्रपतींनी श्रीसमर्थांना दिलेल्या विविध वस्तूंचे संग्रहालय करता येते का तेही पाहू शकतो. किल्ले सज्जनगडावरील बुरूज आणि तटबंदी यांची देखभाल-दुरुस्ती नियमित झाली, तरच हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी राखून ठेवता येईल. श्रीक्षेत्र सज्जनगड येथे ज्या संस्था आहेत, त्यांनी जागेची उपलब्धता पाहून ‘श्रीशिव-समर्थ स्मारक’ उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. ज्या ठिकाणी अडचणी येतील त्या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आम्ही ठामपणे उभे आहोतच.