सतत शिकण्याच्या स्थितीत असलेल्या जामनेर (जिल्हा जळगाव) येथील सौ. जयश्री पाटील (वय ४१ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

सौ. जयश्री पाटील यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

जळगाव – सतत शिकण्याच्या स्थितीत असणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा, सेवेसाठीची तत्परता, नम्रता असे विविध गुण असणार्‍या जामनेर (जिल्हा जळगाव) येथील सौ. जयश्री पाटील यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी घोषित केले. साधकांना ऑनलाईन ‘गुरुमहिमा’ सत्संगाच्या माध्यमातून मार्गदर्शन करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ही घोषणा केली. घोषणा ऐकताच उपस्थित सर्वांची भावजागृती झाली. सत्संगानंतर सौ. जयश्री पाटील यांचे यजमान श्री. रवींद्र पाटील यांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना भेटवस्तू दिली. या सत्संगाला जळगावमधील साधक ऑनलाईन उपस्थित होते.

सौ. जयश्री पाटील

१. सौ. स्मिता पाटील (सौ. जयश्री पाटील यांची धाकटी जाऊ), शेंदुर्णी, जळगाव.

१ अ. विचारण्याची वृत्ती : ‘सौ. जयश्रीताई माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत, तरीही घरातील एखादी सेवा असो किंवा बाहेरची सेवा असो, त्या प्रत्येक गोष्ट विचारून करतात.

१ आ. प्रेमभाव

१. सासरे शेतात लवकर जातात. त्या त्यांना वेळच्या वेळी जेवणाचा डबा करून देतात. त्या सासर्‍यांची वडिलांप्रमाणे पुष्कळ काळजी घेतात.

२. त्यांनी मला पुष्कळ सांभाळून घेतले आहे. त्या माझ्या मोठ्या जाऊबाई असूनही कधीही माझ्याशी अधिकाराने वागल्या नाहीत. त्या माझ्याशी नेहमी मैत्रिणीप्रमाणेच वागतात.

३. त्यांच्या बोलण्यात प्रेमभाव जाणवतो. काही प्रसंगांत मला अडचण आल्यावर मी त्यांच्याशी बोलले. तेव्हा त्यांनी मला दिलेल्या दृष्टीकोनामुळे माझे मन लगेच सकारात्मक झाले होते.

१ इ. परिस्थिती स्वीकारणे : त्यांच्या मुलाला १० वीमध्ये पुष्कळ चांगले गुण मिळाले होते. तेव्हा तो शाळेत पहिला आला होता; परंतु १२ वीमध्ये त्याला तेवढे गुण मिळाले नाहीत. हे समजल्यावर त्या मुलाला रागावल्या नाहीत किंवा त्यांना त्याचे वाईटही वाटले नाही.

‘त्यांच्या माध्यमातून देवाने मला खरोखर एक आध्यात्मिक मैत्रीण दिली आहे’, त्यासाठी गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘त्यांच्यासारखे गुण माझ्यातही यावे’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे. कृतज्ञता !’

२. सौ. मीनाक्षी पाटील, जामनेर, जळगाव.

२ अ. नीटनेटकेपणा : ‘त्यांच्या घरातील साहित्याची रचना त्यांनी सात्त्विक पद्धतीने आणि नीटनेटकी केली असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये आश्रमाप्रमाणे स्पंदने जाणवतात.

२ आ. सात्त्विक रहाणीमान : त्यांचे रहाणीमान, पोशाख, केशभूषा नेहमीच सात्त्विक असते. त्या प्रतिदिन कपाळाला कुंकू लावतात.

२ इ. त्या शिळे अन्न टाकत नाहीत. अन्न शिल्लक राहिल्यास त्या स्वतःच ते संपवतात.’

३. श्री. दत्तात्रय वाघुळदे, जळगाव

३ अ. बालसाधकांच्या साधनेचा आढावा तळमळीने घेणे : ‘जयश्रीताई बालसाधकांच्या साधनेचा आढावा घेतात. ‘सर्वच बालसाधक आढाव्याला जोडले जावेत’, अशी त्यांची तळमळ आहे. बालसाधकांचे प्रयत्न वाढण्यासाठी त्या त्यांना प्रोत्साहन देतात.

३ आ. चुकांविषयी खंत वाटणे : नवरात्रीत प्रतिदिन भाववृद्धी सत्संग असल्यामुळे एकदा त्यांच्याकडून एक दिवसाचा आढावा समयमर्यादेत भरायचा राहिला होता. त्यांनी साधकांकडून आढावा घेऊन रात्री १ वाजता तो आढावा शीटमध्ये भरला. ‘समयमर्यादेत आढावा भरला गेला नाही, तर मी सेवेत न्यून पडते’, या विचाराने त्यांना खंत वाटते.’

४. सौ. विमल कदवाने आणि सौ. मीनाक्षी पाटील

४ अ. भाव

१. ‘त्या सध्या ब्रह्मपूर येथील बालसंस्कार वर्ग घेत आहेत. एकदा त्याविषयी सांगतांना त्या आम्हाला म्हणाल्या, ‘‘तो बालसंस्कार वर्ग घेतांना ‘मी स्वतः एक बालसाधक आहे. मी गुरुदेव किंवा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मांडीवर बसले आहे. हा वर्ग साक्षात् गुरुदेव किंवा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत आहेत. मी केवळ निमित्तमात्र आहे’, असा माझा भाव असतो.’’

२. ‘आपली कृपाळू गुरुमाऊली साधकांचीच नव्हे, तर ब्रह्मांडातील प्रत्येक जिवाची किती काळजी घेते ! तिच्याच कृपेने आपल्याला अन्न, वस्त्र आणि निवारा मिळत आहे’, या जाणिवेने त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येतात.

३. त्या त्यांची भावावस्था शब्दांत व्यक्त करतात. तेव्हा त्यांची वाणी चैतन्यमय वाटते. त्यांचे बोलणे पुष्कळच भावपूर्ण आणि गोड वाटते. ते ऐकून ‘त्या सतत गुरुदेवांचे सान्निध्य अनुभवतात’, असे आम्हाला वाटते.

४. बर्‍याच वेळा त्या व्यष्टी साधनेचा आढावा आणि सकाळचा नामसत्संग यांमध्ये त्यांचे प्रयत्न सांगतात. तेव्हा त्यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती आर्तभाव जाणवतो.’

५. सौ. जयश्री पाटील यांच्यामध्ये जाणवलेले पालट

५ अ. सौ. स्मिता पाटील

५ अ १. त्रासाशी लढण्याची क्षमता वाढणे : ‘आधी आध्यात्मिक त्रास झाला, तर त्यांच्याकडून त्रासाशी लढण्याचा भाग अत्यल्प असायचा. आध्यात्मिक त्रासामुळे त्यांची शारीरिक क्षमता न्यून झाली होती; पण ‘आता ती वाढली आहे’, असे मला जाणवते. त्यांची त्रासाशी लढण्याची क्षमताही वाढली आहे.

५ अ २. स्वेच्छेचे प्रमाण न्यून होणे

अ. आधी त्यांची घरातील किंवा वैयक्तिक गोष्टी यांमध्ये स्वेच्छा असायची. त्यांना आवडेल, तेच त्या घ्यायच्या; पण आता त्या ईश्‍वरेच्छा म्हणून घेतात.

आ. आधी घरात थोडीही अस्वच्छता झाली, तरी त्यांची चिडचिड व्हायची. त्यांना कितीही त्रास झाला आणि त्यांची क्षमता नसली, तरी त्या काहीही करून ती स्वच्छता करायच्या; पण आता त्या तो भाग टाळतात.

५ अ ३. स्वीकारण्याची वृत्ती निर्माण होणे : ‘आधी नातेवाइकांकडे गेल्यावर काही प्रसंग घडला किंवा कुणी काही बोलले, तरी त्या प्रसंगातून त्या बाहेर येऊ शकत नव्हत्या. आता त्यांच्याकडून प्रत्येक प्रसंग सहजपणे स्वीकारला जातो.

५ अ ४. इतरांचा विचार करणे : आता त्यांचा नातेवाइकांकडेे गेल्यावर ‘आपल्या वागण्या-बोलण्यामुळे त्यांचे मन दुखावले जाऊ नये’, असा विचार असतो.

५ अ ५. त्यांच्यातील लढाऊ वृत्ती, तत्त्वनिष्ठता आणि इतरांना समजून घेण्याचा भाग वाढला आहे.

५ अ ६. आता त्या सतत भावाच्या स्तरावर राहून प्रत्येक कृती करतात.’

५ आ. सौ. स्मिता पाटील आणि सौ. विमल कदवाने

५ आ १. अंतर्मुखता वाढणे : ‘सौ. जयश्रीताईंची अंतर्मुखता पुष्कळ वाढली आहे. आधी त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प झाले की, त्या पुष्कळ वेळ त्याच विचारांमध्ये रहायच्या आणि त्यांची नकारात्मकता वाढायची. आता तो भाग न्यून होऊन त्यांची सकारात्मकता पुष्कळ वाढली आहे.’

५ इ. श्री. दत्तात्रय वाघुळदे, जळगाव

५ इ १. शिकण्याच्या स्थितीत वृद्धी होणे : ‘जयश्रीताई गुरुवार आणि रविवार या दिवशी होणार्‍या भाववृद्धी सत्संगांचा आढावा भरण्याची सेवा करतात. आरंभी त्या साधकांकडून आढावा एकत्रित करून द्यायच्या. आता त्यांनी ‘संगणकातील शीटमध्ये आढावा कसा भरायचा ?’, हे शिकून घेतले आहे. त्या शीटमध्ये आढावा भरून देतात.

५ इ २. स्वीकारण्याच्या स्थितीत वाढ होणे : त्यांच्याकडे जिल्ह्यातील नवरात्रीच्या मोहिमेची सेवा होती. तेव्हा ‘मी परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करू शकले नाही’, याविषयी त्यांना नकारात्मकता आली होती. शुद्धी सत्संगात चूक सांगितल्यावर त्यावर साधकांनी सांगितलेला दृष्टीकोन त्यांनी स्वीकारला. नंतर त्या सकारात्मक झाल्या. आता त्या मनमोकळेपणाने बोलतात आणि चुका स्वीकारून त्याप्रमाणे पालट करण्याचा प्रयत्न करतात.’

५ ई. सौ. विमल कदवाने

५ ई १. स्वीकारण्याच्या स्थितीत वाढ होणे : ‘जयश्रीताईंना त्यांच्याकडून सेवेमध्ये झालेल्या चुका किंवा त्यांच्या सेवेविषयी काही दृष्टीकोन दिले, तर त्या ते लगेच स्वीकारतात आणि त्याप्रमाणे सेवेमध्ये पालट करतात.’

५ उ. सौ. मीनाक्षी पाटील

५ उ १. चुका प्रांजळपणे मांडणे : ‘आता त्यांचा व्यष्टी साधनेचा आढावा, शुद्धी सत्संग आणि जिल्हा शुद्धी सत्संग यांमध्ये चूक मांडण्याचा अन् मनाची प्रक्रिया प्रांजळपणे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे’, असे जाणवते.’

५ उ २. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमध्ये वाढ होणे : ‘जयश्रीताईंना तीव्र आध्यात्मिक त्रास आहे. आधी त्या सतत नकारात्मक स्थितीमध्ये रहायच्या. त्या भूतकाळातील प्रसंगांमध्ये पुष्कळ अडकायच्या; परंतु ‘मागील ३ – ४ मासांपासून त्या स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्यासाठी कठोर प्रयत्न करत आहेत’, असे जाणवत आहे.’

५ ऊ. सौ. स्मिता पाटील, सौ. मीनाक्षी पाटील आणि सौ. विमल कदवाने

५ ऊ १. आनंदात वाढ होणे : ‘आता त्यांच्याशी बोलतांना अंतर्मनाला पुष्कळ आनंद जाणवतो.’

५ ए. सौ. मीनाक्षी पाटील आणि सौ. विमल कदवाने

५ ए १. भाव वाढल्याचे जाणवणे : ‘सध्या त्या व्यष्टी साधनेचा आढावा आणि सकाळचा नामसत्संग यांमध्ये त्यांचे प्रयत्न सांगतात. तेव्हा ‘त्या सांगत असलेले प्रयत्न ऐकत रहावे’, असे वाटते. त्यांचे बोलणे ऐकून भाव जागृत होतो. या सप्ताहात त्यांनी गुरुमहिमा सत्संगामध्ये ‘त्या भावाचे प्रयत्न कसे करतात ?’, याविषयी सांगितले. त्या वेळी ‘सर्व साधकांची भावजागृती होऊन सर्वांना शिकायला मिळाले’, असे सद्गुरु जाधवकाकांनी सांगितले आणि त्यांचे कौतुकही केले.’

६. ‘विजयादशमीच्या दिवशी मी त्यांच्या घरी गेले होते. तेव्हा त्या अतिशय सात्त्विक दिसत होत्या. त्यांच्याकडे बघत रहावेसे वाटत होते. त्या वेळी देवाने मला विचार दिला, ‘बहुतेक त्यांची लवकरच प्रगती होईल.’ – सौ. मीनाक्षी पाटील, जामनेर, जळगाव. (जानेवारी २०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक