‘टूलकिट’ प्रकरणी अधिवक्ता निकिता जेकब यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

भारतात कथित पर्यावरणवादी पर्यावरण वाचवण्याच्या नावाखाली देशविघातक कार्य करतात, हे दिसून येते. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

नवी देहली – देहली न्यायालयाने टूलकिट (शेतकरी आंदोलनाविषयीची प्रसारित केलेली संपूर्ण रूपरेषा) प्रकरणी कथित पर्यावरणवादी आणि अधिवक्त्या निकिता जेकब यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. निकिता जेकब यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. निकिता जेकब मुंबई उच्च न्यायालयात अधिवक्ता म्हणून काम करतात. यापूर्वी ‘टूलकिट’ प्रकरणी देहली पोलिसांनी बेंगळुरू येथील पर्यावरणवादी दिशा रवि हिला अटक केली आहे. देहली पोलिसांनी सांगितले की, दिशा रवि, निकिता जेकब आणि शांतनु यांनी टूलकिट बनवले आणि संकलन करण्यासाठी ते इतरांना शेअर केली आहे. तसेच दिशा रवीच्या भ्रमणभाषमधून पुरावे मिळाले आहेत.

(म्हणे) दिशा रवि हिची अटक हे लोकशाहीवरील आक्रमण ! – विरोधी पक्षांचा आरोप

शेतकरी आंदोलनाच्या प्रकरणी ग्रेटा थनबर्ग यांनी पोस्ट केलेल्या ‘टूलकिट’ प्रकरणात पर्यावरणवादी दिशा रवि हिला अटक केल्यावर विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा, शशी थरूर, कपिल सिब्बल यांच्यासहीत द्रमुक नेत्या कनिमोळी, आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टीका करतांना ‘हे लोकशाहीवर आक्रमण आहे’ असे म्हटले आहे.

१. कपिल सिब्बल यांनी ट्वीट करून प्रश्‍न विचारला आहे, ‘दिशा रवि हिच्या एका ट्वीटने देशाच्या सुरक्षेचा धोका निर्माण झाला? देश इतका कमकुवत आहे का ? एक २२ वर्षांची व्यक्ती या राज्याच्या सुरक्षेसाठी धोका ठरत आहे ?’  अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, आपल्या शेतकर्‍यांचे समर्थन करणे हा गुन्हा नाही.

२. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस हिने सरकारवर ‘कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न’ असा आरोप केला आहे, तर ब्रिटीश खासदार क्लॉडिया वेबे हिनेही दिशाच्या अटकेची निंदा केली आहे. (भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात तोंड खुपण्याचा यांना काय अधिकार ? – संपादक)

( सौजन्य : INDIA TV )