भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/448994.html
३. संतांच्या साधनेतील काठीण्य
३ अ. बहुतेक संतांना साधना करतांना पुष्कळ त्रास भोगावा लागणे; मात्र मृत्यूनंतर त्यांची कीर्ती होणे, म्हणजे जणू निवृत्तीनंतर मिळालेला ‘प्रॉव्हिडंट फंड’ ! : भक्ती वाढल्यावर आपल्याला त्यापासून पिटाळून लावण्यासाठी देव श्रीमंतीमध्ये बुडवतोे, नाहीतर गरिबीमध्ये बुडवतो, कधी संकटे आणि दुःख यांच्या डोहात बुडवतो. जे कुणी देवाच्या वाटेला गेले, त्यांना देवाने या संसाराच्या सुखात अडकू दिले नाही. अनेक संतांना कठीण समस्यांना सामोरे जावे लागले. सासरच्यांच्या दबावामुळे संत मीराबाईला विष प्यावे लागले. बांधकाम करत असतांना संत चोखोबांच्या अंगावर भिंत पडून ते तिच्याखाली चिरडून मारले गेले. संत तुकाराम महाराज यांना गरिबी देऊन जगणे अवघड केले. संत गोरा कुंभाराचे मूल पांडुरंगाच्या भजनात दंग असतांना चिखलात चिरडले गेले. पुढे देवाची शपथ मोडली; म्हणून संत गोरोबाने त्याचे हात कोयत्याने तोडले. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची ३ संत असणारी भावंडे यांचे हालहाल झाले. त्यांच्या आई-वडिलांनाही जीव द्यायला लागला. समर्थ रामदास स्वामी लंगोटी लावून लग्नातून पळून गेले; मात्र या सर्व संतांची कीर्ती मेल्यावर होते. कीर्ती महाग आहे. देवाचे वेतन ‘प्रॉव्हिडंट फंड’ आहे. ते मेल्यावर मिळते. जिवंतपणी हालहाल होतात.’
३ आ. सर्वच संतांना समाजाचा विरोध सहन करावा लागतो आणि नंतर तोच समाज संतांचे छायाचित्र लावून त्यांची पूजा करतो ! : ‘सर्वच संतांना समाजाचा विरोध सहन करावा लागला आहे. त्यामुळे त्यांची फार कुचंबणा झाली. हालहाल झाले; परंतु नंतर त्याच समाजाने त्यांना डोक्यावर घेतले आणि छायाचित्र लावून त्यांची पूजा करायला लागले.’
४. खरे ज्ञानी देवाची भक्ती आणि नामस्मरण यांमध्ये गुंग रहात असणे अन् ‘प्रतिदिन किती जन्माला आले अन् मृत्यू पावले’, याची त्यांना खंत वाटत नसणे
‘घरातील माणसे सुखी रहावीत, त्यांना काही न्यून (कमी) पडू नये, भरपूर सुख मिळावे; म्हणून कुटुंबप्रमुखाला फार कष्ट घ्यावे लागतात. तेव्हा कुटुंब सुखी होते. तसेच समाज सुखी व्हावा; म्हणून साधूसंत अनेक हालअपेष्टा भोगूून तपश्चर्या करतात. पुण्य मिळवतात आणि ते समाजाला वाटतात. ते आशीर्वाद देतात; म्हणून गावातील आणि देशातील प्रजा सुखी होते. साधूसंत तपश्चर्या करून पुण्य साठवतात; म्हणून पंचमहाभूते संतुष्ट असतात. फळे, फुले आणि भरपूर झाडे देतात. हे सर्व पुण्य असेल, तरच मिळते. नाहीतर अतीवृष्टी, अनावृष्टी चालू होते, तेव्हा समजावे, ‘पृथ्वीवर पाप भरपूर झाले आहे.’ साधूसंत पुण्य वाटतात आणि स्वतः मात्र भयंकर जंगलात हालअपेष्टा भोगतात. ज्ञान आणि पुण्य साठवतात. ते साधूसंत सुख-दुःखाच्या पलीकडे गेलेले असतात. खर्या साधूंना जन्म-मृत्यूचे काही वाटत नाही. ‘प्रतिदिन किती माणसे जन्माला येतात आणि मरतात किती ?’, या खेळामध्ये साधूसंत रमत नाहीत. ते खर्या शाश्वत सुखाला पोचलेले असतात. संतांना कुणी जन्माला आले, याचा आनंद नाही आणि कुणी मेल्याचे दुःख नाही. हे सर्व अनादी काळापासून चालत आलेले आहे. हे चक्र ईश्वराने निर्माण केलेले आहे. ते कधीही थांबणार नाही. खरे ज्ञानी देवाची भक्ती आणि नामस्मरण यांमध्ये गुंग रहातात. त्यांना संसारापासून वैराग्य प्राप्त झालेले असते.’
५. साधूसंतांना केवळ ज्ञानीच ओळखू शकणे
‘साधूसंत हे चालते बोलते देव असतात; परंतु ते लपून असतात. ते आपला बडेजाव समाजाला दाखवत नाहीत. ते साधे रहातात. ते भगवे किंवा भारी कपडे न वापरता साधी वस्त्रे घालून समाजात वावरतात. समाजात मिळून-मिसळून असतात; परंतु आपणाला ते ओळखता येत नाहीत. त्यांना केवळ ज्ञानीच ओळखू शकतात.’
६. संतांचे वागणे
६ अ. ‘आली दिवाळी आनंदाची । ही वाट द्वारकेची ॥’, असे संत म्हणतात. ते खोटे आहे का ? संतांना दूरदृष्टी होती.’
६ आ. ‘मी जातीपातीवर प्रेम करत नाही, तर जीवात्म्यावर प्रेम करतो. मी जेवढे श्रीमंतावर प्रेम करतो, तेवढेच प्रेम भिकार्यावरही करतो. मी भेदभाव करत नाही.’
६ इ. ‘पुण्य वाटावे का ? ज्या विहिरीला सतत झरे चालू आहेत, ज्या नदीला सतत झर्यांचा प्रवाह चालू आहे, ती विहीर किंवा नदी कधीच आटत नाही. समाजामध्ये दुःखे येतात, तेव्हा बुवाला आशीर्वाद द्यावे लागतात.’
(क्रमशः पुढच्या रविवारी)
– पू. सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)
भाग 3 वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453004.html