पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

पू. सखाराम रामजी बांद्रे

१. देव, संत आणि अवतार गंगेसारख्या पवित्र कुळात जन्म घेत असणे  

कुलाचाराने कुळ शुद्ध, पवित्र आणि पुण्यवंत असल्याविना घराण्यात देव, संत आणि अवतार जन्म घेत नाहीत. संत तुकाराम, संत ज्ञानेश्‍वर महाराज, समर्थ रामदास स्वामी, संत एकनाथ महाराज, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत मीराबाई, संत जनाबाई, संत सखुबाई, कान्होपात्रा इत्यादींची कुळे शुद्ध होती. रघुवंशामध्येे श्रीराम आणि यादव कुळामध्ये भगवान श्रीकृष्ण या अवतारांनी जन्म घेतला. संत किंवा अवतार यांनी जन्म घेण्यासाठी कुळ गंगेसारखे पवित्र असले पाहिजे. गटारगंगेमध्ये देव जन्म घेत नाहीत.

२. संतांची साधना

२ अ. विकार जिंकणे

२ अ १. संत, साधू आणि ऋषि कामविकारांना, तसेच भोग अन् संपत्ती यांनाही महत्त्व देत नसणे : मुलासमोर मोठा माणूस (पुरुष) किंवा स्त्री विवस्त्र असेल, तर त्या मुलाच्या मनात काहीही विचार येत नाहीत; परंतु पुरुषाने विवस्त्र स्त्रीला पाहिले, तर त्याची कामवासना जागृत होते. संतांच्या संदर्भात असे होत नाही; कारण त्यांना गाय-बैल सारखे असतात. संत, साधू आणि ऋषि कामविकारांना थारा देत नाहीत, तसेच ते भोग आणि संपत्ती यांनाही महत्त्व देत नाहीत.

२ आ. साधूसंत देवाची भक्ती करून पुण्य साठवतात आणि देवाकडे पुण्याचे भांडवल दाखवून मोठे स्थान मिळवतात ! : साधूसंतांना सुख-दुःख, लाभ-हानी आणि जय-पराजय सारखेच असतात; म्हणून अतिशय हाल होऊनही साधूसंत सदा आनंदात रहातात. साधू स्वतःच्या मृत्यूच्या दिवशीही हसतात; कारण अशी माणसे अव्यक्तातून येऊन शरीर धारण करतात. संसाराचा खेळ संपला की, जेथून परत येतात, तिकडे परत जातात. त्यांची मधली स्थिती दृश्य आहे. देहाला मरण आहे. आत्मा आणि विकार यांना मरण नाही. पुण्यवंत वैकुंठामध्ये जातात. ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून कायमची सुटका करून घेतात. साधूसंतांना गर्भाशयाच्या विटाळामध्ये ९ मास सडायला आवडत नाही. त्यांना योनीतून जन्म नकोसा वाटतो. पुन्हा जन्म-मरण नको; म्हणून ते देवाची भक्ती करून पुण्य साठवतात आणि देवाकडे पुण्याचे भांडवल दाखवून मोठे स्थान मिळवतात.

२ इ. संतांनी सतत भगवंताचे नामस्मरण केल्यामुळे ते आनंदी असतात, तसेच साधकांनी केल्यास तेही आनंदी होतील ! : संतांचे अंतःकरण निर्मळ असते. संतांना सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय सारखाच वाटतो. त्यांनी देवाचा सतत नामजप केल्याने हे शक्य होते. साधकाला संसाराची पिडा बाधू नये, असे त्यांना वाटते. त्याने सतत भगवंताचे नामस्मरण करावे. त्यामुळे तुमच्या घरात सदा सुख, समाधान, आनंद, शांती आणि यशलक्ष्मी नांदेल.

२ ई. संतांनी संसाराचा पसारा न मांडल्यामुळे त्यांची जीवनयात्रा चांगली पार पडणे आणि त्यांना सुख, समाधान, आनंद अन् शांती लाभणे : संतांनी संसाराचा मोठा पसारा मांडला नाही. पोटाला आवश्यक तेवढेच त्यांनी साठवले. अधिक साठा केला नाही; म्हणून त्यांची जीवनयात्रा चांगली पार पाडली. संत पशूपक्ष्यांसारखे जगले; कारण अधिक संपत्ती आणि संततीने विपत्ती येते; म्हणून साठेबाजी मर्यादित असावी. अधिक लोभी होऊ नका. त्यामुळे सुख, समाधान, आनंद आणि शांती उद्ध्वस्त होईल.

२ उ. काही संतांनी लौकिक भोगाच्या सुखात न अडकता परमार्थ साधणे आणि काहीजण संसार करून मोक्षाला जाणे : संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानेश्‍वर, संत सोपान, संत मुक्ताबाई आणि समर्थ रामदास स्वामी यांनी लौकिक भोगाचे सुख लाथाडून परमार्थ साधला. ही शक्ती केवळ त्यांनाच अवगत होती. बाकीचे जे संत झाले, त्यांनी ते सुख चाखून पाहिले आणि नंतर भोग सोडले, असे होते, उदा. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत नरहरि सोनार, संत सेना न्हावी, संत चोखोबा, संत सुरदास, संत कबीर, संत तुलसीदास. संत सखुबाई, संत मीराबाई, संत गोपाबाई अशा स्त्री संतही होऊन गेल्या. त्या संसार करून मोक्षाला गेल्या.

२ ऊ. पू. बांद्रे महाराजांचा जीव विठ्ठलाच्या नामाने भरून गेल्यामुळे त्यांच्या मनात व्यवहारातील सुख-दुःख, लाभ-हानी, असे विचार न येणे : आता मला माझ्या मीचे विस्मरण झाले आहे. माझा देह, काया आणि अंतःकरण विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या नामाने भरून गेले आहे. मी लौकिक व्यवहारापासून वेगळा झालो आहे. मी वार, दिनांक आणि मास हे सर्व विसरून गेलो आहे. सुख-दुःख म्हणजे काय ?, हेही मला आठवेनासे झाले आहे. माझी देह भरला विठ्ठले, अशी अवस्था झाली आहे. सुख-दुःख, लाभ-हानी, जय-पराजय, हे सर्व मला सारखेच झाले आहेत.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– पू. सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे हे लिखाण २००५ ते २०२० या कालावधीतील आहे.)

देवा, प्रवचनाचे ग्रंथ छापण्यासाठी कर्तबगार मुले माझ्या देशात जन्माला येवोत !

​या प्रवचनाचा ग्रंथ छापण्यासाठी सामर्थ्यवान व्यापार्‍यांकडून साहाय्य घेणे आवश्यक आहे. माझ्या भारतात साई बच्चे जन्मास येवोत. काहीही न करणारे आळशी, कच्चे बच्चे काय कामाचे ? बरे-चांगले कर्तबगार बच्चे देवा माझ्या देशात येवोत,  हीच प्रार्थना मी ईश्‍वराला करीत आहे.- ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे, कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

परात्पर गुरु डॉ. आठवले

रत्नागिरी जिल्ह्यातील पू. (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे महाराज यांनी लिहिलेल्या अद्वितीय ज्ञानावर आधारित सनातन प्रभातमधील लेखमाला !

​ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराज (वय ७० वर्षे) रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांचा अध्यात्म विषयाचा खूप अभ्यास आहे आणि त्यांना ईश्‍वराकडूनही प्रतिदिन ज्ञान मिळते. या दोन्ही ज्ञानांचा ते त्यांच्या कीर्तनात वापर करतात. त्यामुळे त्यांची कीर्तने अप्रतिम होतात आणि कीर्तनाला आलेल्यांना त्यातून खूप शिकायला मिळते. त्यांच्याकडे असलेले अमूल्य ज्ञान त्यांनी मोठ्या आकाराच्या २४ वह्यांत लिहिलेले आहे आणि त्या वह्या सनातन संस्थेला दिल्या आहेत.

​महाराजांच्या वह्या वाचल्यावर माझ्या लक्षात आले की, मी लिहिलेले ग्रंथ विज्ञानाच्या रुक्ष भाषेत आहेत, तर महाराजांचे लिखाण सर्वसामान्य व्यक्तीला कळेल, अशा प्रासादिक भाषेत आहे. त्यांचे लिखाण बहुसंख्य साधकांना उपयोगी पडेल, अशा भक्तीयोगातील आहे. त्यामुळे ते भावपूर्णही आहे. अध्यात्म विषय सर्वांपर्यंत पोचण्यासाठी त्यांचे लिखाण लवकर प्रकाशित होणे आवश्यक आहे. त्यांच्या लिखाणाचे ग्रंथांत रूपांतर करायला २ – ३ वर्षे लागतील. वाचकांना इतकी वर्षे वाट पहायला नको; म्हणून त्यांच्या लिखाणावर आधारित एक लेखमाला दैनिक सनातन प्रभातमध्ये आजपासून  प्रत्येक रविवारी छापण्यात येत आहे. या लेखमालेचा आणि त्यावर आधारित ग्रंथांचा साधकांनी साधनेसाठी लाभ करून घेतल्यास त्यांची प्रगती जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

भाग 2 वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/450938.html