शिवजयंतीच्या कार्यक्रमावरील बंदी मागे घ्या ! – संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे – राज्य सरकारने कोरोनाचे कारण देऊन शिवजयंती कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा निषेध व्यक्त करत निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. वेळ पडल्यास मिरवणुका रहित कराव्यात; मात्र कार्यक्रम झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. त्यामुळे सरकारने शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करून तात्काळ अनुमती द्यावी, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले आहे. शिवजयंतीच्या कार्यक्रमातून समता आणि बंधुता प्रस्थापित केली जाते. त्यामुळे समाजामध्ये चांगला संदेश जातो. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांचे नेते महाराष्ट्रात, तसेच देशभर फिरत आहेत. मग शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी का ? असा प्रश्‍न संभाजी ब्रिगेडने केला आहे.