समुद्रकिनारपट्टीवर ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी नियमांचे कठोरतेने पालन करा !

उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे गोवा पोलिसांना आदेश

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, १८ जानेवारी (वार्ता.) – समुद्रकिनारपट्टीत रात्री १० वाजल्यानंतर खुल्या जागेत ध्वनीक्षेपक लावून ध्वनीप्रदूषण केले जाऊ नये, यासाठी नियमांचे कठोरतेने पालन करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने गोवा पोलिसांना दिला आहे. हणजूण येथे डिसेंबर २०२४ च्या अखेर ध्वनीप्रदूषण झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर गोवा खंडपिठाने हणजूण पोलिसांना डिसेंबर २०२४ मध्ये ध्वनीप्रदूषणाचा आरोप असलेल्या क्लबांचे ‘सीसीटीव्ही’वरील चित्रीकरण मिळवण्यास सांगितले आहे. उत्तर गोव्याच्या किनारपट्टीत ध्वनीप्रदूषण करून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या अवमान याचिकेवर गोवा खंडपिठात सुनावणी चालू आहे. या वेळी गोवा खंडपिठाने हा आदेश दिला.

१. गोवा खंडपिठाचे न्यायाधीश एम्.एस्. कर्णिक आणि न्यायाधीश निवेदिता मेहता म्हणाल्या, ‘‘हणजूण येथील ग्रामस्थांकडून ‘पर्पल मार्टीनी’, ‘सलुद’, ‘ओझरांत’, ‘वागातोर’, ‘डायझ’, ‘अंजुणा’ आणि ‘हिल टॉप’ या ठिकाणी ध्वनीप्रदूषण झाल्याच्या सर्वाधिक तक्रारी आलेल्या आहेत. या ठिकाणी गोवा पोलिसांचे विशेष पथक आणि ध्वनीप्रदूषण देखरेख समिती यांनी आकस्मिक भेटी दिल्या पाहिजेत. आकस्मिक भेट देणे आणि नियमांचे उल्लंघन केलेल्या क्लबांच्या विरोधात कारवाई करणे यासंबंधीचा अहवाल सीलबंद पाकिटात घालून तो खंडपिठाला द्यावा.

२. डिसेंबर २०२४ मध्ये ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींवर हणजूण पोलिसांनी कोणती कारवाई केली ? याविषयीची माहिती द्यावी, तसेच पोलिसांनी वागातोर आणि हणजूण येथे गस्त घातल्यासंबंधी सविस्तर माहिती द्यावी.

३. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने डिसेंबर २०२४च्या काळात ध्वनीप्रदूषण केलेल्या क्लबांविषयी माहिती आणि मंडळाने त्यांच्यावर केलेली कारवाई यांविषयी अहवाल द्यावा.

४. ध्वनीप्रदूषण नियंत्रण समितीने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून ध्वनीपदूषण रोखण्यासाठी कोणती कृती केली ? यासंबंधी माहिती द्यावी.

तत्पूर्वी हणजूण पोलिसांनी गोवा खंडपिठाला प्रतिज्ञापत्राद्वारे पुढील माहिती दिली. पोलिसांकडे १६ डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत ध्वनीप्रदूषणाच्या एकूण २५२ तक्रारी आल्या आहेत. संबंधित ठिकाणी पोलीस अधिकार्‍यांनी जाऊन चौकशी केली आहे. १८ डिसेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत पोलीस उपनिरीक्षक, कर्मचारी, ‘रोबोट किंवा पी.सी.आर्. व्हॅन आणि हणजूण पोलीस ठाण्यातील ‘रॉबीन’ अधिकारी यांची ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे हणजूण पोलिसांनी मोठ्या आवाजात संगीत वाजावणार्‍यांवर देखरेख ठेवणारा विशेष गट नेमला होता आणि गट हणजूण परिसरात गस्त घालत होता. समुद्रकिनारपट्टीत ९ क्लबांनी ‘ऑनलाईन ध्वनी देखरेख यंत्रणा बसवली आहे.

संपादकीय भूमिका

  • न्यायालयाने कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागणे पोलिसांना लज्जास्पद !
  • समुद्रकिनारपट्टी भागातील पोलीस निष्क्रीय आहेत कि त्यांचे ध्वनीप्रदूषण करणार्‍यांशी साटेलोटे आहेत ?