डिचोली, १८ जानेवारी (वार्ता.) – मुळगाव – नानोडा जंक्शनवर असलेल्या अनधिकृत भंगारअड्ड्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी डिचोली हिंदू एकता समितीने मुळगाव पंचायतीकडे केली आहे. या संदर्भात तेजस काणेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने डिचोली हिंदू एकता समितीच्या वतीने मुळगाव पंचायतीला निवेदन दिले आहे. या शिष्टमंडळात प्रियांशू गोवेकर, हर्ष तेली आणि दत्तराज माशेलकर यांचा समावेश होता. डिचोली हिंदू एकता समितीच्या म्हणण्यानुसार डिचोली म्हापसा मार्गावरील मुळगाव नानोडा जंक्शनजवळ असलेला भंगारअड्डा अवैध असून या भंगारअड्ड्यासाठी संबंधित यंत्रणेकडून कोणतीही अनुज्ञप्ती घेण्यात आलेली नाही. या भंगारअड्ड्यावर प्लास्टिक पिशव्या आणि इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने परिसरात समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी काही ठिकाणी भंगारअड्ड्यांना आग लागण्याचे प्रकारही घडले आहेत. या अवैध भंगारअड्ड्यापासून धोक निर्माण होण्याची शक्यता असल्याने यासंबंधी आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी डिचोली हिंदू एकता समितीकडून करण्यात आली आहे. रविवार, १९ जानेवारी या दिवशी मुळगाव ग्रामपंचातीची ग्रामसभा होणार असून या ग्रामसभेत भंगारअड्ड्याचा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे.