पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी ‘पुणे वर्तुळाकार रस्ता’ प्रकल्प हाती !

मुंबई – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (‘एम्.एस्.आर्.डी.सी.’ने) पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी ‘पुणे वर्तुळाकार रस्त्या’चा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम १२ टप्प्यांत होणार असून ९ टप्प्यांतील कामाच्या निविदा अंतिम करून कंत्राट दिले आहे. उर्वरित ३ टप्प्यांतील कामांसाठी असणार्‍या आर्थिक निविदा खुल्या झाल्या आहेत. २ टप्प्यांसाठी ‘अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर’, तर एका टप्प्यासाठी ‘जी.आर्. इन्फ्रा प्रोजेक्ट’कडून सर्वांत अल्पदराने बोली लावली आहे. त्यामुळे या २ आस्थापनांना कंत्राट मिळण्याची शक्यता आहे. एम्.एस्.आर्.डी.सी. १२६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हाती घेणार आहे. हे काम वेगाने होण्यासाठी उर्वरित ३ टप्प्यांतील निविदा अंतिम करण्याच्या कामांनाही वेग आला आहे.