सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीचा निर्णय
सावंतवाडी – ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती(कोल्हापूर)’च्या कारभाराच्या विरोधात २६ जानेवारीपासून समितीच्या येथील कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार असून यात सावंतवाडी तालुक्यातील सर्व देवस्थानचे मानकरी आणि उपसमितीचे पदाधिकारी सहभागी असतील, अशी चेतावणी सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीने दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्या देवस्थान उपसमित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासाठी आणि समितीचा कारभार पहाण्यासाठी घातलेल्या अटी जाचक आहेत. त्या शिथिल करण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत याविषयी धोरण ठरवण्यासाठी सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीची बैठक सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली येथील राजवाड्यात १७ जानेवारीला झाली. या वेळी येत्या ८ दिवसांत योग्य ती कार्यवाही न केल्यास २६ जानेवारीला साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सावंतवाडी येथे झालेल्या बैठकीला सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समितीचे अध्यक्ष एल्.एम्. सावंत (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव राजाराम सावंत (बांदा), खजिनदार विलास गवस (वाफोली) आणि सदस्य उपस्थित होते. या बैठकीनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सावंतवाडी येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले.