सावंतवाडी – पंतप्रधान फळपीक विमा योजनेच्या अंतर्गत शेतकर्यांना देण्यात येणारी हानीभरपाईची रक्कम २२ जानेवारीपर्यंत खात्यात जमा न झाल्यास प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला उपोषण करणार असून प्रसंगी आत्मदहन करू, अशी चेतावणी आंबा बागायतदार संघटनेने जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली आहे.
पंतप्रधान फळ पिक विमा योजनेत सहभागी असलेल्या आंबा आणि काजू बागायतदार शेतकर्यांची विमा आस्थापनाने फसवणूक केली आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये जिल्ह्यातील सर्वच आंबा आणि काजू बागायतदारांना पालटत्या हवामानाचा फटका बसला होता. गेल्या वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत अकाली पाऊस, अती तापमान आणि फळमाशीचा संसर्ग अशी संकटे आली. यामुळे आंबा पिकामध्ये लक्षणीय घट झाली. याला आता वर्ष होत आले, तरी निरवडे मंडळातील शेतकर्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत विमा रक्कम जमा झालेली नाही. कृषी विभागाने वारंवार विमा आस्थापनाशी पत्रव्यवहार करूनही ते आस्थापन नोंद घेत नाही. निरवडे, कुडाळ तालुक्यातील गोठोस, ओरोस बुद्रुक, दोडामार्ग तालुक्यातील तळकट, अशा ५ मंडळांतील एकूण १२ कोटी रुपये विमा रक्कम शेतकर्यांना मिळालेली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी संघटनेच्या उपाध्यक्षा दिव्या वायंगणकर, दाजी तुळसकर, सुरज डिचोलकर, रमेश नाईक, प्रताप चव्हाण, सीताराम घोगळे आदी शेतकरी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाशेतकर्यांसह प्रशासनालाही विमा आस्थापन जुमानत नसेल, तर सरकारने याची नोंद घेऊन विमा आस्थापनाला समजेल, अशाप्रकारे आवश्यक ती पाऊले उचलली पाहिजेत ! |