उत्तराखंडमध्ये तुटलेल्या हिमकड्याच्या ढिगार्‍यामुळे ऋषिगंगाचा प्रवाह थांबून निर्माण झालेला तलाव फुटला, तर पुन्हा प्रलय येण्याची शक्यता !

देहरादून (उत्तराखंड) – काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या चमोलीतील जोशी मठ येथे हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयानंतर पुन्हा अशी स्थिती येेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे हिमकडा तुटल्यानंतर जमा झालेल्या ढिगार्‍यामुळे ऋषिगंगा नदीचा वरचा प्रवाह थांबला आहे. नदीचा प्रवाह थांबल्यामुळे येथील पाण्याचे तलावात रूपांतर झाले आहे. जर हा तलाव फुटला, तर वेगाने येणार्‍या पाण्यामुळे पुन्हा प्रलयासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ‘आय सॅटेलाइट इमेज’ आणि प्रत्यक्ष घटनास्थळी केलेल्या निरीक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी दाखल झालेली शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार ढिगारा आणि चिखल जमा झाल्यामुळे ऋषिगंगा नदीचा प्रवाह थांबला आहे. याचा अर्थ नदीचे पाणी कुठेतरी जमा होत आहे. त्यामुळे तिथे दिसत असलेल्या तलावात किती पाणी आहे, याची माहिती घेणे आवश्यक आहे. जर तलाव मोठे असेल, तर हे तुटल्यानंतर डोंगराखालील भागात महापूर येऊ शकतो. त्यामुळे या तलावातून पाणी काढण्याचा पर्याय शोधावा लागेल.