निरपेक्ष प्रार्थना करण्याविषयी शिकायला मिळालेले सूत्र आणि प्रार्थना केल्यावर आलेल्या अनुभूती

१. धर्मप्रेमींच्या बैठका घेतांना विषयाला विराम देण्यापूर्वी प्रार्थना करण्याचा दृष्टीकोन लक्षात येणे

श्री. हर्षद खानविलकर

‘एका कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाची सांगता करतांना एका साधकाकडून ‘आपल्या हिंदु राष्ट्राच्या कार्यामध्ये सर्व हिंदु धर्मप्रेमींचा सहभाग होऊ दे, अशी अपेक्षा करतो’, असे वक्तव्य केले गेले. या संदर्भात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी एका सत्संगात ‘आपण कुणाकडूनही अपेक्षा करायला नको. आपल्या कार्यात सर्व हिंदु धर्मप्रेमींचा सहभाग व्हावा; म्हणून भगवंताच्या चरणी प्रार्थना करू शकतो’, असे सूत्र सांगितले होते. त्यानंतर काही जिल्ह्यांच्या धर्मप्रेमींच्या बैठका घेतांना विषय संपल्यावर त्यांना कृतीच्या स्तरावर काही प्रयत्न करायला दिले जायचे. त्यानंतर ते ध्येय पूर्ण होण्यासाठी आणि हिंदु राष्ट्राच्या (कलियुगांतर्गत सत्ययुगाच्या) कार्यामध्ये सर्वांचे तन अन् मन यांचा त्याग होऊन सर्वांकडून कार्य घडावे’, अशी प्रार्थना करून विषयाला गुरुचरणी विराम देणे चालू केले.

२. समर्पितभावाने प्रार्थना केल्याने अहंयुक्त विचार न्यून होऊन ‘देवच सर्वांकडून सेवा करवून घेत आहे’, असा भाव जागृत होणे

‘भगवंत आणि गुरु यांच्या चरणी समर्पितभावाने प्रार्थना केल्याने धर्मप्रेमींचे कृतीच्या स्तरावरील प्रयत्न चालू झाले. अल्प कालावधीमध्येही त्यांनी कृतीच्या स्तरावर सेवा केली’, असे मला शिकायला मिळाले आणि ‘आपण सांगितल्यामुळे समोरचा कृतीशील होतो’, असा अहंयुक्त विचार न्यून होऊन ‘देवच सर्वांकडून कृतीच्या स्तरावर सेवा करवून घेत आहे’, असा मनामध्ये भाव जागृत झाला.

​श्रींच्या कृपेने हे प्रयत्न भगवंत माझ्याकडून करवून घेत आहे. यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी अखंड कृतज्ञता व्यक्त करतो आणि ‘गुरुचरणांपर्यंत पोचण्याचे विविध साधनेचे प्रयत्न या अपात्र जिवाकडून करवून घ्यावेत’, अशी शरणागतभावाने प्रार्थना करतोे.’

– श्री. हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२३.११.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक