८ फेब्रुवारीपासून कोरोना महामारीच्या विरोधात आघाडीवर लढणार्‍या कर्मचार्‍यांसाठी लसीकरण मोहीम

पणजी, ६ फेब्रुवारी (वार्ता.) – ८ फेब्रुवारीपासून कोरोना महामारीच्या विरोधात आघाडीवर लढणार्‍या कर्मचार्‍यांसाठी लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला जाणार असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या उपसंचालिका डॉ. वंदना धुमे यांनी दिली. कोरोना लसीसाठी पोलीस कर्मचारी, होम गार्ड, पालिका कर्मचारी, पंचायत राज संस्थांचे कर्मचारी आणि आपत्कालीन व्यवस्थापनाशी निगडित कर्मचारी मिळून एकूण १५ सहस्र ६५७ कर्मचार्‍यांचे कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी ७ फेब्रुवारी ही अंतिम दिनांक असल्याने ही संख्या आणखी वाढू शकते.

उपसंचालिका डॉ. वंदना धुमे पुढे म्हणाल्या, आतापर्यंत १९ सहस्र ३२९ आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले आहे आणि आरोग्य कर्मचार्‍यांच्या लसीकरणाची मोहीम १२ फेब्रुवारीला संपणार आहे. गोवा शासनाला आतापर्यंत ४१ सहस्र ५०० कोव्हीशिल्ड लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यात ५० वर्षांहून अधिक वय असलेल्यांचे, तर ४ टप्प्यांत विविध आजारांनी ग्रस्त असलेले आणि अंतिम टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणारे कर्मचारी यांना लस विनामूल्य दिली जात आहे.

कोरोना लस हा महामारीवरील एकमेव कायमस्वरूपी उपाय ! – डॉ. बोरकर

कोरोनाची लस ही सुरक्षित आणि परिणामकारक आहे. कोरोना लस हा महामारीवरील एकमेव कायमस्वरूपी उपाय आहे, असे मत राज्याचे लसीकरण मोहीम हाताळणारे अधिकारी डॉ. बोरकर यांनी दिली. ते म्हणाले, लोकांनी कोणतीही भीती न बाळगता लस घेतली पाहिजे.

प्रथम डोस घेतल्यानंतर ६ आठवड्यांनी १०० टक्के प्रतिकारक्षमता निर्माण होते ! – डॉ. उत्कर्ष बेतोडकर

कोरोनाची लस ही दोन टप्प्यांत घ्यायची असते. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जातो. दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी प्रतिकामक्षमता निर्माण होते. प्रथम डोस घेतल्यानंतर ६ आठवड्यांनी १०० टक्के प्रतिकारक्षमता निर्माण होते आणि ही प्रतिकारक्षमता एक वर्ष टिकते, अशी माहिती डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली.