आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानाकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

  • भारत सरकारकडून रिहानावर टीका

  • अभिनेत्री कंगना राणावत हिच्याकडून विरोध

शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून भारताची प्रतिमा मलीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. यासाठी सरकारने स्वतःची बाजू जोरकसपणे मांडून आंदोलनात घुसलेल्या समाजविघातक घटकांविषयीची माहिती समोर आणणे आवश्यक आहे !

शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानाचा पाठिंबा

नवी देहली – देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानाने ट्वीट करत पाठिंबा दिला. रिहानाने ‘आपण शेतकरी आंदोलनावर बोलत का नाही आहोत ?’, अशी विचारणा केली आहे. सी.एन्.एन्. या अमेरिकेतील वृत्तसंकेतस्थळावर ‘शेतकर्‍यांच्या आंदोलानच्या ठिकाणी इंटरनेटबंदी’ अशा आशयाखाली शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे वृत्त देण्यात आले आहे. या वृत्ताचा संदर्भ देत रिहाना हिने ट्वीट केले आहे.

रिहानाच्या ट्वीटला भारतीय अभिनेत्री कंगना राणावत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, ‘कुणीही यावर बोलत नाही; कारण आंदोलन करणारे शेतकरी नाहीत, तर आतंकवादी आहेत, जे भारताची विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तू मूर्ख आहेत. आम्ही तुमच्याप्रमाणे देश विकायला काढलेला नाही.’

तथ्य समजून न घेता प्रतिक्रिया व्यक्त करणे अयोग्य ! – भारत सरकार

भारतीय परराष्ट्र मंत्रालयालयानेही रिहानाचा विरोध केला आहे. त्यानी म्हटले आहे की, प्रसिद्ध असणार्‍या व्यक्तींकडून सनसनाटी निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाच्या हॅशटॅगचा आणि वक्तव्ये यांद्वारे लोकांना आकर्षित करण्याचा प्रकार योग्य नसून ते दायित्वशून्यता दर्शवते.

अशा प्रकारे या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी सूत्रांची माहिती घेणे योग्य ठरले असते. भारताच्या संसदेने संपूर्ण चर्चेअंती कृषी विषयक कायदे संमत केले आहेत.