संसार आणि साधना यांची योग्य सांगड घालणार्‍या सौ. समृद्धी राऊत !

सौ. समृद्धी राऊत

१. व्यवस्थितपणा

सौ. वृंदा मराठे

‘सौ. समृद्धीचा स्वतःचा कप्पा असो, लिखाण असो किंवा सेवेशी संबंधित साहित्य असो ते व्यवस्थितच असते. तिच्या लिखाणाच्या वह्या सुंदर असतात. त्यांतून चांगली स्पंदने येतात. ‘तिचे लिखाण पाहून वाचत रहावे’, असे वाटते. ते वाचतांना मनाला चांगले वाटते.

२. प्रेमभाव

अ. तिने सर्वांना प्रेमाने बांधून ठेवले आहे. सासर आणि माहेर (राऊत आणि मराठे) अशा दोन्ही कुटुंबियांची ती लाडकी बनली आहे. शौनकला (समृद्धीच्या भावाला) काही महत्वाचे सांगायचे असेल, तर तो आम्हाला न सांगता आधी तिला सांगतो.

आ. तिच्या सासूबाईंनी आधी पुष्कळ कष्ट केले आहेत. ‘आतातरी त्यांना व्यवस्थित रहाता येऊ दे’, असा तिचा विचार असतो. तिच्या परीने ती त्यांना साहाय्य करत असते.

३. तत्परता 

ती सेवा प्रलंबित न ठेवता तत्परतेने करते. सगळ्याच गोष्टीत ती तत्पर असते.

४. समोरच्याची अडचण समजून घेऊन ‘योग्य काय असले पाहिजे ?’, हे ती साधनेच्या सिद्धांतानुसारच सांगते. त्यामुळे ते पटते आणि स्वीकारता येते.

५. संसार आणि साधना या दोन्हींची योग्य सांगड घालणे

संसार आणि साधना दोन्हींची सांगड तिने व्यवस्थित घातली आहे. ती साधना म्हणून घरचे दायित्व परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. ती योग्य नियोजन करून दोन्हींचा मेळ व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न करते.

६. आज्ञापालन

‘काही प्रसंग कसे हाताळायचे ?’, याविषयी तिच्या मनात संभ्रम असेल, तर ती त्याविषयी आम्हाला न विचारता साधनेच्या दृष्टीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे मार्गदर्शन घेते आणि त्यांनी सांगितलेल्या सूत्रांचे १०० टक्के आज्ञापालन करते. इथे ती कुठेही भावनेत अडकत नाही. हे तिचे वैशिष्ट्य आहे.

७. तत्त्वनिष्ठता

घरचे असू दे किंवा आश्रमातील प्रसंग असू दे. ती तत्त्वाला धरून निर्णय घेते. त्यामुळे सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबांना तिचा आधार वाटतो. ती तेवढ्याच तत्त्वनिष्ठपणे आमच्या चुका सांगून आम्हाला ‘साधनेच्या दृष्टीने योग्य कसे असायला हवे ?’, हे सांगते.

८. जेव्हा आम्ही तिघे एकत्र येतो, तेव्हा ती नसेल, तर आम्हाला चैन पडत नाही. ती असल्यावर एक वेगळा उत्साह आणि आनंद जाणवतो.

९. बोलण्यातील सतर्कता

तिला सूत्रेही लगेच सुचतात. एकदा माझा मुलगा शौनक मला म्हणाला, ‘‘मी सोने जरी अर्पण केले, तरी त्याचे पितळ होईल, एवढे माझे तीव्र प्रारब्ध आहे.’’ त्यावर समृद्धीने लगेच त्याला सांगितले, ‘‘तू दत्ताचा जप करत पितळ जरी अर्पण केले, तर त्याचा हिरा होईल.’’ हे ऐकून तो गप्प झाला.

१०. कुटुंबाचे दायित्व साधना म्हणून आनंदाने सांभाळणे 

तिचे माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी वागणे एकसारखेच असते. स्नेहल (सौ. समृद्धीचे यजमान) इथे नसूनही सर्व कुटुंबाचे दायित्व ती चांगल्या प्रकारे साधना म्हणून सांभाळत आहे आणि हे करतांना त्रस्त न रहाता ‘आनंदात रहाणे’ हे ती दैवी बालिका असल्याचे दर्शवते.

११. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे 

ती एवढ्या लहान वयात अनेक प्रसंगांना धैर्याने सामोरी गेली आहे. स्नेहल इथे नसतांना ती दायित्व घेऊन सर्व करते. याविषयी तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ‘स्नेहलने इथे रहावे’, अशी तिची अपेक्षा नसते किंवा त्याविषयी तक्रारही नसते. जी परिस्थिती आहे, ती तिने मनापासून स्वीकारली आहे अन् त्यात ती आनंदी रहाते आणि इतरांनाही आनंदी करण्याचा प्रयत्न करते, हे विशेष आहे.

१२. तिच्या वडिलांचा त्रास वाढला असल्याचे हे मला समजत नाही; पण तिला लगेच समजते. त्यांच्या तोंडवळ्याकडे पाहून तिला त्यांची स्थिती लगेच कळते.

१३. संतांनी केलेले कौतुक

अ. सद्गुरु राजेंद्रदादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) मला म्हणाले, ‘‘सौ. समृद्धी सर्व छान सांभाळते.’’

आ. एकदा श्री श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मला म्हणाल्या, ‘‘समृद्धी मोठी झाली. सगळे छान सांभाळते आणि साधना म्हणून सर्व करते. कशात अडकत नाही, हे विशेष आहे.’’

– सौ. वृंदा मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.