गंगापूर येथे भव्य मिरवणुकीद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची स्थापना

प्रतिकात्मक छायाचित्र

गंगापूर (जिल्हा संभाजीनगर) – शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पंचधातूच्या अश्‍वारूढ पुतळ्याची ३० जानेवारी या दिवशी भव्य मिरवणुकीद्वारे स्थापना करण्यात आली. यानंतर शिवप्रेमींनी आनंदोत्सव साजरा करत महाराजांच्या पुतळ्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या. महाराणा प्रताप चौक येथे युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भव्य स्वागत केले. जिजामाता चौकामध्ये नगराध्यक्ष वंदना प्रदीप पाटील आणि महिला भगिनी यांनी पुष्पहार अर्पण करून महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. गंगापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, गणेश खंडागळे आणि रिजवान शेख यांनी महाराजांच्या पुतळ्याला पूजन करून पुष्पहार अर्पण केला.