पुणे महापालिकेचा ५ अरुंद रस्त्यांवरही सायकल मार्ग विकसित करण्याचा घाट

पूर्वी चालू केलेली सायकल योजना बंद का पडली, याचा अभ्यास महापालिकेने करणे अपेक्षित आहे. केवळ योजना चालू करण्यापेक्षा त्यांचा समाजाला लाभ होणे आवश्यक आहे. असे होत नसेल, तर अशा योजना विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यासाठी तर केल्या जात नाहीत ना, असा विचार कुणाच्या मनात आला तर चूक ते काय ?

पुणे – स्वारगेट-खडकवासला या मार्गावर सायकल मार्ग अस्तित्वात येण्याची शक्यता नसतांना या मार्गावर सायकल मार्ग विकसित करण्यासाठी पावणेदोन कोटी रुपयांची उधळपट्टी करणार्‍या महापालिकेने शहरातील ५ अरुंद रस्त्यांवरही सायकल मार्ग विकसित करण्याचा घाट घातला आहे. सायकल योजना बंद पडली असतांनाही केवळ उधळपट्टीसाठी सायकल मार्गांच्या विकसनाची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे अनावश्यक उधळपट्टीची कामे थांबवावी, हा महापालिका आयुक्तांचा आदेशही कागदावरच राहिला आहे.

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने सायकल वापर करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ अंदाजपत्रकात सायकल मार्ग विकसित करण्यासाठी तरतूद असल्यामुळे शहरात नव्याने सायकल मार्ग विकसित करण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले आहे. शहरातील सायकल मार्गांची दुरवस्था आहे. ज्या ठिकाणी सायकल मार्ग आहेत, तेथे त्यांचा अपेक्षित विनियोग होत नाही.