ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराज यांच्या सन्मानसोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे आणि त्यांच्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले गौरवोद्गार !

ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराज यांनी लिहिलेल्या २२ मोठ्या वह्यांतील अद्वितीय ज्ञानावर आधारित सनातन प्रभातमधील लेखमाला !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘ह.भ.प. (पू.) सखाराम रामजी बांद्रे महाराज रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. त्यांचा अध्यात्म विषयाचा खूप अभ्यास आहे आणि त्यांना ईश्‍वराकडूनही प्रतिदिन ज्ञान मिळते. या दोन्ही ज्ञानांचा ते त्यांच्या कीर्तनात वापर करतात. त्यामुळे त्यांची कीर्तने अप्रतिम होतात आणि कीर्तनाला आलेल्यांना त्यातून खूप शिकायला मिळते. त्यांच्याकडे असलेले अमूल्य ज्ञान त्यांनी अनेक वह्यांत लिहिलेले आहे. यातील २२ मोठ्या वह्या त्यांनी सनातन संस्थेकडे पाठवल्या आहेत. त्यांच्या लिखाणाचा एक नमुना पुढील परिच्छेदात दिला आहे.

प्रवचनकार आणि कीर्तनकार यांनी प्रवचने किंवा कीर्तने विनामूल्य करावी !

‘प्रवचनकार आणि कीर्तनकार यांनी प्रवचनासाठी मानधन  घेऊ नये. आर्थिक क्षमता नसेल, तर फारतर गाडीभाडे घ्यावे; कारण देवाचे गुणगान आणि कथा ऐकायला येणारे तेवढ्यापुरते का होईना, देवाशी एकरूप झालेले असतात. संत तुकाराम महाराज आपल्या ग्रंथात म्हणतात, ‘तुका म्हणे द्रव्य घेती । देती तेही नरका जाती ।’ – तुकाराम गाथा, अभंग ११३०, ओवी ४ सगळ्या अभंगांवर कीर्तनकार निरूपण करतात; परंतु या अभंगावर कोणी निरूपण करत नाहीत. कीर्तनकार कीर्तनासाठी हा अभंगही निवडत नाहीत; कारण आपण लोकांना सांगायचे पैशाचा लोभ धरू नका आणि आपण पैशाचे पाकिट मागायचे, म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडे पाषाण ।’, हे मला पसंत नाही. मी आळंदीला जाऊन ज्ञानेश्‍वरांच्या समाधीला साक्ष ठेवून ‘प्रवचनाचे मानधन घेणार नाही’, अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे मी या रत्नागिरी जिल्ह्यात ६०० प्रवचने केली; परंतु कोणाकडूनही मानधन घेतलेले नाही.

माझ्याही आतापर्यंत, म्हणजे जानेवारी २०२१ पर्यंत ३३३ ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी आदी १७ भाषांत ८१ लाख ४० सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. महाराजांच्या वह्या वाचल्यावर माझ्या लक्षात आले की, मी लिहिलेले ग्रंथ विज्ञानाच्या रुक्ष भाषेत आहेत, तर  महाराजांचे लिखाण सर्वसामान्य जनतेला कळेल, अशा प्रासादिक भाषेत आहे. त्यांचे लिखाण बहुसंख्य साधकांना उपयोगी पडेल, अशा भक्तीयोगातील आहे. त्यामुळे ते भावपूर्णही आहे. अध्यात्म विषय सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे लिखाण लवकर प्रकाशित होणे आवश्यक आहे. त्यांच्या लिखाणाचे ग्रंथांत रूपांतर करायला ३ – ४ वर्षे लागतील. वाचकांना इतकी वर्षे  वाट पहायला नको; म्हणून त्यांच्या लिखाणावर आधारित एक लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये पुढील रविवार पासून छापण्यात येणार आहे. या लेखमालेचा आणि त्यावर आधारित ग्रंथांचा साधकांनी साधनेसाठी लाभ करून घेतल्यास त्यांची प्रगती जलद गतीने होईल, याची मला खात्री आहे.

हे सर्व लिखाण पू. बांद्रे महाराज यांनी लिहिलेले असल्याने त्यावर आणि त्यावर आधारित ग्रंथांवर पू. बांद्रे महाराज यांचे ‘लेखक’ म्हणून त्यांचे नाव लिहिले जाणार आहे. मी सर्व वह्यांतील मजकुराचे केवळ संकलन करत असल्याने माझे नाव केवळ ‘संकलक’ म्हणून लिहिले आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ह.भ.प. (पू.) सखाराम बांद्रे महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत

जीवात्म्याचा शिवात्म्याशी संपर्क झाला आहे ! – पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज

ह.भ.प. (पू.) सखाराम बांद्रे महाराज यांची एक भावमुद्रा

‘उकिरड्यांवर असलेल्या माणसाला परात्पर गुरुदेवांनी ओळखले. गेली १५ वर्षे केलेल्या लिखाणाचे काय करायचे, याची मला काळजी होती. त्यातून गुरुदेवांनी मुक्त केले आहे. आज माझा भाग्याचा दिवस उजाडला आहे. जीवात्म्याचा शिवात्म्याशी संपर्क झाला आहे. गुरुदेवांनी माझ्यावर कृपा केली आहे. त्यांचे उपकार या जन्मात तरी फेडू शकणार नाही. मला उजेडात आणल्याविषयी मी गुरुदेव आणि सनातन संस्था यांचा आभारी आहे. मला सर्वांनी सांभाळून घ्या, चुका झाल्या असल्यास माफ करा. मला आपल्यात सामावून घ्या. जेवढी द्याल तेवढी सेवा करीन.

आज जीवात्म्याला झालेला आनंद व्यक्त न करण्यासारखा आहे. तो मी वर्णन करू शकत नाही. ‘माझ्या आयुष्यात कधी असा क्षण येईल’, याची मला कल्पना नव्हती. आजचा दिवस सुवर्ण अक्षरांत लिहिण्यासारखा आहे. प.पू. गुरुदेवांनी एवढ्या दूरवर राहून त्यांच्या सूक्ष्म दृष्टीने मला ओळखले. माझ्यासारख्या छोट्या माणसाचा सन्मान केला आहे. मला एकदा गुरुदेवांची भेट घ्यायची आहे. मला त्यांना पहाण्याची तळमळ लागली आहे. ‘मी रामनाथीला कधी जाईन, कधी पाहीन’, असे झाले आहे’, अशा भावपूर्ण शब्दांत पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी मनोगत व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘सर्वांनी देव, देश आणि धर्म यांचा विचार केला पाहिजे. त्यांचा सांभाळ करावा. सर्वांनी सत्याने म्हणजेच धर्माने वागावे. परोपकाराने, नियतीने वागा म्हणजे देव तुम्हाला भेटायला येईल. ही सत्य वाणी आहे. षडरिपू, १४ विकार शरिरावर आवरण आणतात. त्यावर नामाने आळा घाला. भक्तीमार्ग वाढवला पाहिजे.’’

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचा परिचय

१. व्यावहारिक जीवन

‘पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज हे निवळी, कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे रहाणारे आहेत. त्यांनी २८ वर्षे ‘प्लास्टिक बॅग्स’चे विक्रेता म्हणून व्यवसाय केला.

२. साधना

अ. पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांना वयाच्या १० व्या वर्षापासून अध्यात्माची आवड आहे. त्यांनी वारकरी संप्रदायातून साधना केली आहे. सध्या ते मंदिराचे पुजारी आहेत. त्यांनी वर्ष १९८५ मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी भांडुप, मुंबई येथे पू. वामनराव पै यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली.

आ. ते वर्ष १९९५ पासून प्रवचने करत आहेत. रामायण, महाभारत आणि संतचारित्रे यांवर ते प्रवचने करतात. त्यांनी ह.भ.प. शांताराम महाराज कानसे यांच्याकडून प्रेरणा घेतली. ते प्रवचनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत.

३. ईश्‍वराकडून ज्ञान मिळणे

मागील १५ वर्षांपासून त्यांना ईश्‍वराकडून ज्ञान मिळत आहे. पुष्कळ वेळा त्यांना पहाटे ४ वाजण्याच्या वेळी ज्ञान मिळते. त्यांना प्रतिदिन २ – ३ वेळा आणि दिवसातून साधारणतः ३० मिनिटे ज्ञान मिळते.

४. अनुभूती

त्यांना २ – ३ वेळा सुदर्शनचक्राचे दर्शन झाले आहे.’

अद्वितीय लिखाण करणारे पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांची त्यांच्या लिखाणासंदर्भातील नम्रता !

पू. बांद्रे महाराज धरतीमातेची पूजा करतात तिथे उमटलेला ‘ॐ’

‘आपल्याला आवडणारे माझे लेखच छापावेत. माझे शिक्षण चौथी आहे. लिखाणात काना-मात्रा अशा चुका झाल्या असल्यास सुधारून घ्याव्यात. माझी मराठी शुद्ध नाही, तरी मला सांभाळून घ्यावे. चुकीचे लेख छापू नयेत. ‘माझ्याशी कुठली देवता बोलते आणि मला ज्ञान देते’, हे मलाच ठाऊक नाही. मी विठ्ठल-रखुमाईचे एक छोटेसे मंदिर स्वकष्टाने बांधले आहे. त्याची २० वर्षे पूजा करत आहे. माझ्या अंगणात मी जिथे धरतीमातेची पूजा करतो आणि धूप दाखवतो, तिथे एका स्त्रीचे जटाधारी सुंदर रूप लादीवर स्पष्ट उमटले आहे. तिच्या पायाजवळ मोठा ‘ॐ’ही स्पष्ट दिसत आहे.

डोंबिवलीचे श्री. विजय लोटलीकर माझे मित्र आहेत. त्यांची मुलगी आपल्या आश्रमात मोठे दायित्व पार पाडत असते. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले तिचे लेख मी वाचतो.’

– ह.भ.प. सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

सद्गुरु सत्यवान कदम यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटका होते ! – सद्गुरु सत्यवान कदम

सद्गुरु सत्यवान कदम

सध्याचे जीवन संघर्षाचे आणि तणावपूर्ण आहे. अशा वेळी अध्यात्म कृतीत आणून साधना करणे महत्त्वाचे आहे. जन्म-मृत्यूच्या चक्रातून सोडवतो आणि पापांचा नाश करतो तो म्हणजे जप ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाने म्हणजेच गुरुकृपायोगानुसार साधना केल्यास आपली जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटका होते. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केल्याने चित्त शुद्ध होते आणि ईश्‍वराचे विचार ग्रहण करता येऊन साधना चांगली होते. यासाठी ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहोत’, असा भाव ठेवून साधना केली पाहिजे.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक