सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान
सातारा, ३१ जानेवारी (वार्ता.) – देशात अधर्म वाढल्यामुळे देशाचे धर्मतेज निघून गेले आहे. इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले. इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टच्या निमित्ताने रस्त्यावर प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस येतात. दुसर्या दिवशी हेच राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जातात. आपण सर्वांनी अशी प्रतिज्ञा केली पाहिजे की, राष्ट्रध्वजाचा अवमान स्वत: करणार नाही, तसेच इतरांनाही करू देणार नाही. हिंदु युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती जागृत करणे आवश्यक आहे. त्यांना राष्ट्ररक्षणाचे धडे देऊन आपणच राष्ट्रप्रेमी युवा पिढी सिद्ध केली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले.
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ५.३० या वेळेत ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. सातारा जिल्ह्यातील ७० हून अधिक युवक आणि युवती यांनी या ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचा लाभ घेतला.
श्री. सुमित सागवेकर पुढे म्हणाले की, भारत देश सर्वांगसुंदर आणि सर्वगुणसंपन्न देश आहे. येथील कणाकणात सात्त्विकता आहे. यामुळे भारत देश भविष्यात निश्चितच विश्वगुरुपदावर आरुढ होईल. भारतमातेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्वांनी राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी प्रतिदिन १ घंटा देणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. वैभव क्षीरसागर यांनी केली. सूत्रसंचालन आणि आभरप्रदर्शन श्री. महेंद्र निकम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कु. प्राची शिंत्रे यांनी म्हटलेल्या संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ने झाली.