‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेल्या संशोधनाविषयीच्या लेखांना प्रसिद्धी

स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचाकडून ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधन कार्याची नोंद

पुणे – दौंड तालुक्यातील केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’ने वर्ष २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ४ लेखांना प्रसिद्धी देण्यात आली आहे. या लेखांमध्ये या विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले आणि विश्‍वविद्यालयाच्या मानसोपचारतज्ञ डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी लिहिलेल्या पुढील लेखांचा समावेश आहे.

१. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन : सुखी जीवनाचा कानमंत्र

२. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे सोशल मिडियावरील महत्त्वपूर्ण संशोधन

३. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने हाती घेतलेले अभूतपूर्व संशोधन कार्य

४. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे धार्मिक चिन्हांच्या संदर्भातील अमूल्य संशोधन

१. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन : सुखी जीवनाचा कानमंत्र

या लेखात अध्यात्मशास्त्रानुसार मनुष्य जीवनाचे घटक, संस्कारांचे महत्त्व आणि त्यातून निर्माण होणारी वृत्ती, स्वभाव आणि त्यामुळे होणारी हानी, राष्ट्राची दु:स्थिती दूर करण्यासाठी सुसंस्कारित समाजमनाची आवश्यकता, तसेच स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया आदींविषयी विस्तृतपणे माहिती दिली आहे.

२. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे महत्त्वपूर्ण संशोधन

या लेखात ‘सामाजिक माध्यमे पाहिल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर हानीकारक परिणाम कसा होतो ?’ याचे सविस्तर विश्‍लेषण करण्यात आले आहे. यात सामाजिक माध्यमांचा सूक्ष्म स्तरावरील परिणामांचा आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास देण्यात आला आहे.

३. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने हाती घेतलेले अभूतपूर्व संशोधन कार्य

या लेखात विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्.’ (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) हे आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या आधारे करण्यात आलेल्या जगभरातील मातीच्या नमुन्यांच्या अभ्यासाच्या अंतर्गत नोव्हेंबर २०१९ पर्यंत हाती आलेल्या मातीच्या नमुन्यांच्या केलेल्या चाचण्यांचे विश्‍लेषण देण्यात आले आहे, तसेच मानवाचा भूमीवर होणारा हानीकारक प्रभाव टाळण्यासाठी आणि भूमीच्या मानवावर होणार्‍या हानीकारक प्रभावापासून रक्षण होण्यासाठी साधना करण्यासही सांगण्यात आले आहे.

४. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे धार्मिक चिन्हांच्या संदर्भातील अमूल्य संशोधन

या लेखात ‘स्वस्तिक’ या हिंदु धर्मातील पवित्र आणि मंगलकारी चिन्हाच्या विविध रूपांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा ‘यू.ए.एस्.’ आधुनिक वैज्ञानिक उपकरणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास देण्यात आला आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’ने प्रकाशित केलेल्या ‘स्वयंभू’ या दिवाळी अंकाचे केडगाव येथील पुष्प चिकित्सालयातील डॉ. नीलेश लोणकर हे संपादक असून ते हिंदुत्वनिष्ठ आहेत. या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अन्य काही प्रसिद्ध लेखकांचे राष्ट्र, धर्म, अध्यात्म यांविषयीचे अभ्यासपूर्ण लेखही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या अंकाचे दीड सहस्रांहून अधिक वाचक आहेत.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.