धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून राज्यात ठिकठिकाणी निवेदन !

बसच्या पाटीवर ‘संभाजीनगर’ नाव असल्याने वैजापूर येथील धर्मांधांनी विरोध केल्याचे प्रकरण

धुळे/नांदेड, ३० जानेवारी (वार्ता.) – वैजापूर (जिल्हा संभाजीनगर) येथे घडलेल्या घटनेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एका एस्.टी. बसवर ‘संभाजीनगर’ अशी पाटी होती. त्यामुळे स्थानिक धर्मांधांनी बस अडवली. तेथे त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली, तसेच बसचे चालक आणि वाहक यांना दमदाटी करत ‘आम्हीपण आमच्या भाषेत उत्तर देऊ’, अशी चिथावणीखोर भाषा वापरली. या प्रकरणी हिंदु एकता आंदोलन पक्षाच्या वतीने गृहमंत्र्यांना जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. (संभाजीनगर अशा नामकरणाची महाराष्ट्रातील शिवप्रेमींची मागणी असतांना चिथावणीखोर भाषा वापरून कायदा-सुव्यवस्था हातात घेऊ पहाणार्‍या उद्दाम धर्मांधांना वेळीच रोखायला हवे ! – संपादक)

नंदुरबार – येथील निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनाही अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले. या वेळी स्वराज्य निर्माण सेनेचे श्री. दिग्विजय ठाकरे, शिवप्रेमी श्री. राजेश गवळी, गोरक्षक श्री. भूषण पाटील, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सतीश बागुल आणि राहुल मराठे उपस्थित होते.

नांदेड – उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी आर्य चाणक्य सेनेचे श्री. अभिजीत पाटील, विश्‍व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री. शशिकांत पाटील, नांदेड महानगरमंत्री श्री. गणेश कोकुलवार, श्री. गौरव वाळिंबे, गोसेवक श्री. बिरबल यादव, हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. गणेश कोंडलवार, श्री. गिरीश रघोजीवार, धर्मप्रेमी श्री. राम वाघमारे, श्री. नागेश बुंदेले, श्री. पुरभाजी तिडके, श्री. दयानंद माळवतकर उपस्थित होते.

नांदेड येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

परभणी –येथेही निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदोडकर यांना निवेदन देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शुभम पाटील, श्री. महेंद्र सोनपेठकर, परशुराम संस्कार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. विठूगुरु वझरकर, श्री. सुधाकर पाटील, समितीच्या वतीने श्री. श्रीनिवास दिवाण उपस्थित होते.

नगर – येथेही निवासी उपजिल्हाधिकारी संदीप विष्णू निचित यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. रामेश्‍वर भुकन, भाजपच्या महिला आघाडीच्या सौ. सुरेखा विद्दे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अरुण ठाणगे आणि अन्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जामखेड येथेही तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,

१. संभाजीनगरची पाटी पाहून जर कुणाला अयोग्य वाटले, तर महाराष्ट्रात अजूनही कायद्याचे राज्य आहे ना ? रितसर आपली तक्रार योग्य त्या ठिकाणी करून दाद मागू शकतो. असे असतांना रस्त्यावर गाडी अडवून धिंगाणा घालण्याचा केलेला प्रयत्न महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य आहे का ? कि यापुढे कुणाला काही अयोग्य वाटले, तर त्याने असेच संख्याबळ जमवून रस्त्यावर धिंगाणा घालून, शिवीगाळ करून, दमदाटी करून आपली मागणी रेटून नेणे योग्य होईल ? याविषयी विचार करणे आवश्यक आहे. राज्याचे गृहमंत्री या नात्याने आपण या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

२. वैजापूर येथे एस्.टी बस अडवून सरकारी कामात अडथळा आणणार्‍यांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५३ अंतर्गत कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, म्हणजे यापुढे कुणी कायदा स्वतः हातात घेण्याचा प्रयत्न करणार नाही.