मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई येथे सायबर गुन्ह्यांची संख्या तुलनेने अधिक आहे. सायबर गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी, तांत्रिक साहाय्यासाठी पोलिसांना तसेच तक्रारदारांना गुन्हे शाखेच्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलीस ठाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. आता सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबईत ५ सायबर पोलीस ठाणी उभारण्यात आली आहेत. या नवीन सायबर पोलीस ठाण्यांमध्ये २ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंतचे फसवणुकीचे गुन्हे नोंद केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्यांमध्ये ५० टक्के मनुष्यबळ हे महिलांचे असणार आहे. प्रजासत्ताक दिनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सर्व पोलीस ठाण्यांचे उद्घाटन करण्यात आले. ही पोलीस ठाणी पूर्व विभागात गोवंडी भागातील शिवाजीनगर येथे, पश्चिम विभागात वांद्रे येथे, उत्तर विभागात समतानगर येथे, मध्य विभागात वरळी येथे तसेच दक्षिण विभागात दादासाहेब भडकमकर मार्ग येथे अशा ५ ठिकाणे असणार आहेत.