सांगलीत वेश्या व्यवसाय चालणार्‍या हॉटेलवर धाड; आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अटकेत

  • गुन्हेगारी आणि अनैतिक कृत्ये यांत लिप्त असलेले सांगली पोलीस !
  • ज्यांच्यावर समाजात घडणारे गुन्हे रोखण्याचे दायित्व असते, तेच पोलीस अधिकारी जर वेश्या व्यवसायासारख्या प्रकरणात सापडत असतील, तर अशांकडून गुन्हा रोखण्याची अपेक्षा काय करणार ? स्वातंत्र्यानंतर धर्मशिक्षणाच्या अभावी ज्या प्रमुख खात्यात अनैतिकता आणि भ्रष्टाचार बोकाळला आहे त्यात पोलीस खाते सर्वांत अग्रक्रमावर आहे, असे दिसून येते !
‘हॉटेल रणवीर’ आणि पोलीस निरीक्षक अरुण देवकर

सांगली, २९ जानेवारी – कर्नाळ रस्त्यावर असलेल्या ‘हॉटेल रणवीर’ येथे वेश्या व्यवसाय चालू आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रणवीर हॉटेलवर धाड टाकली असता अन्य संशयितांसह आटपाडीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना अटक  केली. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या गुन्ह्यात सत्यजित दिगंबर पंडित (ब्राह्मणपुरी, मिरज), हॉटेलमालक राघवेंद्र शेट्टी, रवींद्र शेट्टी, व्यवस्थापक राजेंद्र यादव, दलाल शिवाजी गोंधळे तथा वाघळे यांनाही अटक केली आहे. या सर्वांच्या विरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षा’ला या हॉटेलमध्ये अशा प्रकारची कृत्ये चालतात याची माहिती मिळाली. यानंतर २८ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या हॉटेलमध्ये अनधिकृतरित्या वेश्या व्यवसाय चालू होता; मात्र ग्रामीण पोलिसांना याची माहिती नव्हती, याविषयी नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. (ही आहे पोलिसांची कार्यक्षमता ! – संपादक)

सांगली पोलीसदलाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे पोलीस निरीक्षक !

गेल्या मासात कडेगाव पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांना बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. यानंतर लगेचच दुसर्‍या मासात आटपाडी येथील पोलीस निरीक्षकांना वेश्या व्यवसाय प्रकरणी अटक करण्यात आली. या दोन प्रकरणांमुळे सांगली जिल्हा पोलीसदलाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.