(म्हणे) ‘पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.चे माजी प्रमुख भारताचे गुप्तहेर !’ – पाकचा आरोप

आय.एस्.आय.चे माजी प्रमुख लफ्टनंट जनरल असद दुर्रानी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकची गुप्तहेर संघटना आय.एस्.आय.चे (‘इंटर सर्व्हिस इंटेलिजेन्स’चे) माजी प्रमुख लफ्टनंट जनरल असद दुर्रानी हे भारतीय गुप्तचर संघटना ’रॉ’चे (‘रिसर्च अँड अ‍ॅनलिसिस विंग’चे) गुप्तहेर असल्याचे पाकच्या सरकारने म्हटले आहे. असद दुर्रानी हे ‘रॉ’समवेत वर्ष २००८ पासून संपर्कात होते. त्याचे पुरावेही उपलब्ध आहेत, असे पाकच्या सरकारने म्हटले आहे.

१. असद दुर्रानी यांचे नाव ‘रॉ’चे माजी प्रमुख ए.एस्. दुल्लत यांच्याशी जोडले गेले. या दोघांनीही काही वर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एकत्रितपणे ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आय.एस्.आय. अ‍ॅण्ड द इल्यूजन ऑफ पीस’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे पाकच्या सैन्याची मोठी नाचक्की झाली. या पुस्तकात काश्मीर, बुर्‍हान वानी, हाफिज सईद, कारगिल युद्ध, कुलभूषण जाधव, बलुचिस्तान, सर्जिकल स्ट्राइक आदींचाही उल्लेख आहे. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या एक गुप्त समझौता झाला होता. या पुस्तकामुळेच वर्ष २०१८ मध्ये पाकिस्तानी सैन्याने दुर्रानी यांच्यावर सैन्य आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आय.एस्.आय. अ‍ॅण्ड द इल्यूजन ऑफ पीस’

२. ‘एक्झिट कंट्रोल लिस्ट’मध्ये माझे नाव पाक सरकारने चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केले आहे, असा दावा करत दुर्रानी यांनी उच्च न्यायालयात यचिका प्रविष्ट केली आहे. ‘मला परदेशात जायचे आहे. त्यामुळे सरकारने प्रतिबंध हटवावे’ अशी मागणीही त्यांनी केली. फेब्रुवारी मासात या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.