दावोस, स्वित्झर्लंड येथील जागतिक परिषदेत वर्ष २०२० मधील जगभरातील पाण्याची आध्यात्मिक स्थिती – या विषयावर शोधनिबंध सादर !

दावोस, स्वित्झर्लंड येथे पार पडलेल्या जागतिक परिषदेत वर्ष २०२० मधील जगभरातील पाण्याची आध्यात्मिक स्थिती – तुमच्या पाण्यातून कोणती स्पंदने प्रक्षेपित होतात ? या विषयावर शोधनिबंध सादर !

दावोस, स्वित्झर्लंड येथे ९.८.२०२० या दिवशी जागतिक परिषद पार पडली. त्यात एस्.एस्.आर्.एफ्. आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांच्या वतीने द स्पिरिच्युअल स्टेट ऑफ द वर्ल्ड्स वॉटर इन २०२० विच व्हायब्रेशन्स डज् युअर् वॉटर एमिट ? अर्थात् वर्ष २०२० मधील जगभरातील पाण्याची आध्यात्मिक स्थिती – तुमच्या पाण्यातून कोणती स्पंदने प्रक्षेपित होतात ?, या विषयावर शोधनिबंध सादर केला. परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक असून सद्गुरु सिरियाक वाले आणि श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत. सद्गुरु सिरियाक वाले यांनी हा शोधनिबंध सादर केला. या वेळी परिषदेला उपस्थित असलेल्यांचे अभिप्राय, वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. परिषदेच्या आदल्या दिवशी सामूहिक नामजप आणि ध्यानधारणा यांचे सत्र आयोजित करणे अन् त्यात सहभागी झालेले प्रवक्ते, तसेच अन्य मान्यवर यांपैकी काही जणांना नामजपानंतर शांतता अनुभवता येणे

परिषदेसाठी आमंत्रित वक्ते आणि अन्य मान्यवर यांच्यासाठी परिषदेच्या आदल्या दिवशी, म्हणजे ८.८.२०२० या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. हान्स मार्टिन यांनी सामूहिक नामजपाच्या सत्राचे आयोजन केले. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित केलेला ॐ नमो भगवते वासुदेवाय । हा नामजप लावण्यात आला होता. केवळ २० मिनिटांच्या नामजपाच्या सत्रात उपस्थितांपैकी अनेकांना आतून शांत वाटले.

सद्गुरु सिरियाक वाले

२. व्हॉट इज द रिअल गोल्ड इन वॉटर ?

या विषयाच्या अंतर्गत पाणी या विषयावर केलेले आध्यात्मिक संशोधन सद्गुरु सिरियाक वाले यांनी सादर केले. प्रवक्ते आणि मान्यवर यांसह एकूण ५० लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. आम्ही सादर केलेला विषय अन्य प्रवक्त्यांच्या विषयांच्या तुलनेत नवीन आणि आध्यात्मिक स्तरावर असूनही उपस्थित जिज्ञासूंनी तो सहजपणे स्वीकारला.

३. उपस्थितांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

३ अ. शोधनिबंधाचे सादरीकरण पहातांना जर्मनीतील प्रा. राल्फ ऑटरफॉल यांना स्वतःमध्ये काहीतरी जागृत झाल्यासारखे जाणवणे : हँबर्ग, जर्मनी येथील इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्निकचे प्रा. राल्फ ऑटरफॉल यांनी शोधनिबंधाचे सादरीकरण पहातांना मला स्वतःमध्ये काहीतरी जागृत झाल्याचे जाणवले, असे आम्हाला सांगितले. आपल्या संशोधन कार्याचा दृष्टीकोन त्यांना चित्तवेधक वाटला. प्रा. राल्फ यांना व्याख्यान आवडल्याने त्यांनी साधना कशी करायची ? याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा आमच्याकडे व्यक्त केली. तसेच युरोप येथील ८० टक्के पाण्याचे नमुने नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करत असल्यामुळे त्याचा परिणामही नकारात्मकच होत असल्याचे समजताच ते आश्‍चर्यचकित झाले. त्यांनी याविषयी अधिक शिकण्याची जिज्ञासा दर्शवली आणि व्याख्यानासाठी कृतज्ञता व्यक्त केली.

३ आ. एकत्रितपणे संशोधन कार्य करण्याची संधी मिळणे : पाणी याविषयी डॉ. इमोटो यांचा शोधनिबंध सादर करणारे अन्य प्रवक्ते रॅस्मस गौप-बर्गहौसेन हे एक संशोधक असून त्यांनी भविष्यात आमच्या समवेत एकत्रितपणे संशोधन कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली.

३ इ. इटली येथील चित्रपट दिग्दर्शिका आणि सामाजिक कार्यकर्तीने साधना आरंभ करण्याची आवश्यकता व्यक्त करणे : इटली येथील माग्दालिना श्‍नायझर यांनीसुद्धा व्याख्यान सादर केले. त्या चित्रपट दिग्दर्शिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या म्हणाल्या, परिषदेच्या आदल्या दिवशी घेण्यात आलेला सामूहिक नामजप आणि व्याख्यान यांना उपस्थित राहिल्यानंतर मला प्रामाणिकपणे साधना आरंभ करण्याची आवश्यकता वाटत आहे.

४. परिषदेच्या आयोजिका श्रीमती लॅडिना प्रिया किंडची यांनी दिलेले अभिप्राय

अ. परिषदेत आम्ही शोधनिबंध सादर केल्याविषयी परिषदेच्या आयोजिका श्रीमती लॅडिना प्रिया किंडची यांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी आम्हाला दैवी बालके यावर पुढील वर्षी होणार्‍या परिषदेत विषय मांडण्यासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही सादर केलेल्या विषयाच्या संदर्भात त्यांना पुष्कळ जणांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. तसेच पुढील वर्षी परिषदेत एस्.एस्.आर्.एफ्. आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय सहभागी होतील. तेव्हा स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन आणि साधना यांविषयी एक आध्यात्मिक शिबिर आयोजित करूया, असेही त्या म्हणाल्या.

आ. सद्गुरु सिरियाक वाले यांच्याकडून मिळालेले ज्ञान आणि प्रीती यांमुळे त्या पुष्कळ प्रभावित झाल्या. त्या म्हणाल्या, मी सद्गुरु सिरियाक वाले यांच्या जवळ बसून ध्यान लावत असतांना मला त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले. त्यांच्यातील भक्तीभाव, तसेच एस्.एस्.आर्.एफ्. आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय यांच्या साधकांची निःस्वार्थी अन् सेवाभावी वृत्ती पाहून मला गहिवरून येते.

इ. भारतियांना पाणी पूजनीय आहे. गंगा नदीच्या घाटावर अंतिम क्रियाकर्म केले जाते, तरीही त्या पाण्यात देवत्व असल्यामुळे भारतीय पवित्र गंगेत स्नान करतात, हे कळल्यावर श्रीमती लॅडिना प्रिया किंडची पुष्कळ प्रभावित झाल्या. या व्याख्यानामुळे साधना करण्याचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबले आहे.

५. अन्य वैशिष्ट्ये

अ. प्रा. राल्फ ऑटरफॉल आणि अन्य जिज्ञासू यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आयोजित करण्यात येणार्‍या ५ दिवसीय कार्यशाळेला उपस्थित रहाण्याची इच्छा व्यक्त केली.

आ. उपस्थितांपैकी पुष्कळ जणांनी आम्ही नामजप करणे चालू करू, असे सांगितले, तसेच जिज्ञासूंनी नामजपाच्या एकूण १० ध्वनीचकत्या विकत घेतल्या.

६. संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

६ अ. सद्गुरु सिरियाक वाले

६ अ १. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या ज्ञानाचा केवळ प्रचार आणि प्रसारच होत नसून ते ज्ञान समाजमनात स्वीकारले जाऊन रुजत असल्याचे जाणवणे : विषयाचे सादरीकरण करतांना मला शांत वाटत होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेल्या ज्ञानाचा केवळ प्रचार आणि प्रसारच होत नसून ते ज्ञान समाजमनात स्वीकारले जाऊन रुजत आहे, असे मला जाणवत होते; तसेच ही प्रक्रिया सूक्ष्मातून स्थुलाकडे वाटचाल करत आहे, असेही मला जाणवले.

६ आ. गेर्लिंडे द्रोम्ब्रोव्हस्की

६ आ १. रज-तमात्मक वातावरणातही नामजप करता येणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवणे : आम्ही स्वित्झर्लंडच्या सीमेत प्रवेश करताच माझ्यावरील काळ्या शक्तीचे आवरण आणि आध्यात्मिक त्रास यांत वाढ झाली. परिषद चालू असतांना मी सद्गुरु सिरियाक वाले यांच्या शेजारी बसून ते मांडत असलेल्या विषयाचे उपस्थितांना भाषांतर करून सांगत होते. त्या वेळी वातावरणात रज-तम अधिक असूनही माझा नामजप सहजतेने होत होता, तसेच मला अनेकदा तिथे परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवत होते. मला भाषांतर करण्याची सेवा आणि त्यातून शिकण्याची संधी मिळाली, त्याविषयी मला कृतज्ञता वाटत होती.

६ आ २. सद्गुरु सिरियाक वाले यांच्या शेजारी बसल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व जाणवून सुरक्षित वाटणे आणि स्वतःतील ईश्‍वरी तत्त्वाची जाणीव होण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार मनात येणे : परिषदेच्या एका सत्रात जेव्हा गायन आणि नृत्य सादर केले जात होते, तेव्हा मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास जाणवत होता. सद्गुरु सिरियाकदादा आणि मी नामजप करत होतो. त्या वेळी मला तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवून सुरक्षित वाटत होते. सद्गुरु सिरियाकदादा यांच्या समवेत बसून नामजप करण्याची संधी मिळाल्याने मला कृतज्ञ वाटत होते. केवळ सद्गुरु सिरियाकदादा यांच्या शेजारी बसूनच सुरक्षित न वाटता स्वतःतील ईश्‍वरी तत्त्वाची जाणीव होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे; कारण ईश्‍वराचे अस्तित्व सर्वत्र असते, असा विचार माझ्या मनात आला.

६ आ ३. सद्गुरु सिरियाकदादा विषय मांडत असतांना त्यांच्याकडून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होत असून ते उपस्थितांच्या अंतर्मनात जात असल्याचे जाणवणे : सद्गुरु सिरियाकदादा विषय सादर करत असतांना त्यांच्यातील चैतन्य तेथील वातावरणात प्रवाहित होत असून ते उपस्थितांच्या अंतर्मनात जात आहे, असे मला जाणवत होते. ते मांडत असलेला विषय मी उपस्थितांना भाषांतर करून सांगतांना मला शब्द सहजतेने सुचत होते. त्यामुळे मला भाषांतर करणे सहज जमले. परात्पर गुरु डॉक्टरांनीच मला सुस्पष्टता आणि सुरक्षा प्रदान करून माझ्याकडून ही सेवा करवून घेतली, असे मला वाटते.

६ आ ४. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु सिरियाक वाले यांच्यात अद्वैत असल्याचे जाणवणे : परिषदेची सांगता झाल्यावर मी घरी जाण्यासाठी रात्री आगगाडीने प्रवास करत होते. सद्गुरु सिरियाकदादा यांच्या शेजारी बसले असतांना मला जी सुरक्षितता जाणवली होती, तशीच सुरक्षितता मला त्या वेळी जाणवत होती. परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु सिरियाकदादा यांच्यात अद्वैत आहे, असे मला वाटले आणि ते माझे खरे पिता आहेत, असे वाटून माझी भावजागृती झाली.

संकलक : (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (ऑगस्ट २०२०)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक