कणकवली – शहरातील तेलीआळी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बाधित होत आहे. फेब्रुवारी मासात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून त्यापूर्वी येथील पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी मराठा समाजाने आग्रही भूमिका घेतली आहे. त्याअनुषंगाने २६ जानेवारीला आमदार, खासदार, मंत्री, लोकप्रतिनिधी आणि येथील प्रतिष्ठित नागरिक यांना एकत्रित आणून पुतळ्याच्या जागेसाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती मराठा समाजाचे नेते एस्.टी. सावंत यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेच्या अनुषंगाने मराठा समाज बांधवांची बैठक येथील मराठा मंडळ सभागृहात २० जानेवारीला झाली. या बैठकीला लवू वारंग, भाई परब, बच्चू प्रभुगावकर, सुशील सावंत, सखाराम सपकाळ, अविनाश राणे, यश सावंत आदी उपस्थित होते.
या वेळी एस्.टी. सावंत म्हणाले की, छत्रपतींचा पुतळा महामार्ग चौपदरीकरणात येथील उड्डाणपुलाखाली असल्याची गोष्ट खेदजनक आहे. याविषयी राजकीय पुढार्यांनी वेगवेगळ्या भूमी सुचवल्या; मात्र या भूमींना विरोधही झाला. त्यामुळे आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबितच राहिला. या प्रश्नी सर्वांनी एकमताने छत्रपतींच्या पुतळ्यासाठी भूमी निश्चित करण्याची आवश्यकता आहे. कणकवली शहराच्या लौकिकाला शोभेल, असा निर्णय आपण सर्वांनी एकत्रित येऊन घेतला पाहिजे. आमदार, खासदार आणि मंत्री यांनी पुतळ्याच्या ठिकाणची पहाणी केली; मात्र कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मागणी करावी लागली. गेली ३ वर्षे हा प्रश्न प्रलंबित असतांना याविषयी ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे या प्रश्नी आता मराठा समाजाने पुढाकार घेतला आहे.