सातारा जिल्ह्यातील पहिल्या दहा (टॉप टेन) गुन्हेगारांची यादी सिद्ध ! – शंभूराज देसाई

शंभूराज देसाई

सातारा, २२ जानेवारी (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांची पार्श्‍वभूमी असणार्‍या पहिल्या दहा (टॉप टेन) गुन्हेगारांची यादी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सिद्ध केली आहे. या निकषातील गुन्हेगारांवर तातडीने मोक्का आणि एम्.पी.डी.ए. (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिव्हिटी) कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

गृहखात्याचा कारभार हाती घेतल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त येथील शिवतेज सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शभूराज देसाई पुढे म्हणाले की, २ गुन्हेगारांवर एमपीडीएएम्.पी.डी.ए.नुसार, तर ९ गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. १ सहस्र ४४९ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून १० सहस्र ४११ जणांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. सातारा पोलिसांनी धडक कारवाई करत गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वर्ष २०१९ मध्ये ३५.५ टक्के होते, तर तेच वर्ष २०२० मध्ये ५८.४१ टक्क्यांवर पोचले आहे. वर्ष २०१९ च्या तुलनेत वर्ष २०२० मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे.