ब्रिटनमधील खासदाराच्या तक्रारीनंतर ‘बीबीसी’ने जम्मू-काश्मीर वगळून दाखवलेले भारताचे मानचित्र मागे घेत केली क्षमायाचना !

भारताच्या चुकीच्या मानचित्राला ब्रिटनमधील खासदार विरोध करतो; मात्र भारत सरकार आणि भारतातील खासदार विरोध करत नाहीत, हे लज्जास्पद !

लंडन (इंग्लंड) – येथील ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी कार्यक्रम सादर करतांना भारताचे चुकीचे मानचित्र (नकाशा) दाखवल्याच्या प्रकरणी क्षमा मागितली आहे. या मानचित्रात बीबीसीने जम्मू-काश्मीरचा भाग दाखवला नव्हता.

‘इंडो-ब्रिटिश ऑल पार्टी पार्लियामेंट्री ग्रुप’चे अध्यक्ष आणि लेबर पार्टीचे खासदार वीरेन्द्र शर्मा

याविषयी ब्रिटनमधील ‘इंडो-ब्रिटिश ऑल पार्टी पार्लियामेंट्री ग्रुप’चे अध्यक्ष आणि लेबर पार्टीचे खासदार वीरेन्द्र शर्मा यांनी बीबीसीला पत्र लिहिले होते. यात त्यांनी म्हटले होते, ‘हे मानचित्र अर्धवट आहे. यात काश्मीरचा भाग दाखवण्यात आलेला नाही, जो भारताचा अविभाज्य भाग आहे. अशा प्रकारे भारताचा भाग मानचित्रात न दाखवणे, हा ब्रिटनमध्ये रहाणार्‍या भारतियांचा आणि भारताचा घोर अवमान आहे. त्यामुळे बीबीसीने हे मानचित्र मागे घ्यावे आणि पुन्हा अशा प्रकारची कृती करू नये.