‘अॅमेझॉन प्राईम’वर प्रसारित करण्यात येत असलेल्या ‘तांडव’ वेब सिरीजला दिवसेंदिवस हिंदुत्वनिष्ठांचा विरोध वाढत आहे. निर्माते हिमांशू मेहरा, दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या या वेब सिरीजच्या माध्यमातून भगवान शिव अन् प्रभु श्रीराम यांचे विडंबन करण्यात आले आहे. यासह हिंदु धर्म, भारत, हिंदू यांचे अयोग्य पद्धतीने चित्रण केलेले असून सांप्रदायिकता, जातीद्वेष आदींचा पुरस्कार करण्यात आला आहे.
वेब सिरीजच्या मुख्य भूमिकेमध्ये ‘समर प्रताप सिंह’ (अभिनेते सैफ अली खान) आणि ‘शिवा शेखर’ (अभिनेते महंमद झिशान) हे असून सध्या या सिरीजचे ९ भाग ‘अॅमेझॉन प्राईम’वर प्रसारित करण्यात आले आहेत. या सिरीजच्या माध्यमातून सूक्ष्मतेने हिंदु धर्माला न्यून लेखण्यात आले आहे. ‘तांडव’ वेब सिरीजमधील काही प्रमुख प्रसंग पुढीलप्रमाणे आहेत.
१. भारतीय सरकारी व्यवस्था ही मुसलमानविरोधी !
सिरीजच्या आरंभी शेतकर्यांचे एक आंदोलन दाखवले असून सत्ताधारी पक्ष ते चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांच्या मुलाच्या अगदी जवळचा राजकीय नेता पोलिसांना आंदोलनात सहभागी झालेल्या तीन मुसलमान युवकांना ठार मारण्याचा आदेश देत आहे. त्यातील ‘आयुब’ आणि ‘सलीम’ यांच्यावर गोळीबार करून त्यांना ठार करण्यात येते. या माध्यमातून भारतात सत्ताधारी पक्षच कशा प्रकारे मुसलमानांची हत्या घडवतात, असा अप्रत्यक्ष संदेश देण्याचा धर्मांध दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे.
२. हिंदु धर्मरक्षक स्वामी विवेकानंद यांचा अपमान !
वरील तीन युवकांपैकी ‘इमरान’ नावाचा युवक हा गोळीबाराच्या आधीच त्याच्या देहलीतील महाविद्यालयात गेल्याने तो वाचला आहे. विवेकानंद विश्वविद्यालय (व्हि.एन्.यू.) असे या महाविद्यालयाचे नाव असून ते राष्ट्रद्रोही नि साम्यवादी यांचा भरणा असलेल्या देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाशी (‘जे.एन्.यू.’शी) साधर्म्य असल्याचे दाखवले आहे. या माध्यमातून हिंदु धर्मरक्षक नि योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांचाही एक प्रकारे अपमानच करण्यात आला आहे.
३. भगवान शिव आणि प्रभु श्रीराम यांचे विडंबन !
विश्वविद्यालयात एक कार्यक्रम चालू असून त्यात ‘शिवा शेखर’ नावाचा विद्यार्थी भगवान शिवाचे कपडे धारण करून त्याचे विडंबन करत आहे. उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हसे कोसळले असून नाटकाच्या माध्यमातून प्रभु श्रीरामाचा अपमानही करण्यात आला आहे.
४. भारतीय पोलीस ‘जनताद्रोही’ असल्याचे चित्र उभे करण्याचा प्रयत्न !
नाटकाच्या कालावधीत इमरान हा ‘आतंकवादी’ असल्याचे म्हणत पोलीस त्याला अटक करतात. ही अटक अवैध असल्याचे सांगत शिवा शेखर आणि सर्व विद्यार्थी पोलीस ठाणे गाठतात. तेथे पोलीस विद्यार्थ्यांवरच लाठी आक्रमण करतात; परंतु विद्यार्थ्यांनीच पोलिसांवर आक्रमण केल्याने काही पोलीस घायाळ होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवरच गुन्हा नोंद करण्यात आल्याचे दाखवले आहे. या माध्यमातून भारतीय पोलीस जनतेवर कशा प्रकारे अन्याय करतात, हे दाखवले आहे.
५. राष्ट्रद्रोही नेत्यांशी साधर्म्य असल्याची पात्रे !
नंतर शिवा शेखर एक खोटे (डमी) नाटक उभे करून शेतकर्यांच्या आंदोलनात पोलिसांकरवी दोन मुसलमान युवकांना ठार मारल्याचा व्हिडिओ प्रसारित करतो. वाढत्या जनक्षोभामुळे पोलिसांना इमरानला सोडून द्यावे लागते. या प्रसंगातून शिवा शेखर हा जे.एन्.यू. विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सध्याचा साम्यवादी पक्षाचा नेता कन्हैया कुमार यांच्यासारखा, तर इमरानला देशद्रोहाचा आरोप असलेल्या उमर खालिदशी साधर्म्य असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘सना मीर’ नावाची व्ही.एन्.यू.तील युवती ही राष्ट्रद्रोही शेहला रशीदशी साधर्म्य असल्याचे चित्रित केले आहे.
६. ‘तुकडे तुकडे गँग’च्या घोषणांचे चित्रण !
इमरानच्या सुटकेवरून विश्वविद्यालयात आनंदाचे वातावरण असून वर्ष २०१६ मध्ये ‘जे.एन्.यू.’मध्ये ज्या प्रकारे ‘भारत तेरे तुकडे होंगे…’ आदी राष्ट्रद्रोही घोषणा देण्यात आल्या होत्या, त्या प्रकारेच त्यांच्याशी साधर्म्य असणार्या आणि लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणार्या घोषणा देतांना ‘व्ही.एन्.यू.’चे विद्यार्थी दाखवले आहेत. येथे एक महत्त्वपूर्ण सूत्र विचारात घेण्यासारखे आहे, ते म्हणजे सर्व विद्यार्थी अत्यंत चांगले, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे आणि आदर्शवादी असल्याचे चित्रित करण्यात आले आहे. या माध्यमातून डाव्या विचारसरणीचा उदोउदो होत असल्याचे लक्षात येते.
७. भाजपविरोधी चित्रण !
सत्ताधारी पक्ष ‘जन लोक दल’ हा भाजपशी साधर्म्य असल्याचे चित्रित करून तो उजव्या विचारसरणीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षाचे सर्वेसर्वा ‘देवकीनंदन’ देशाचे पंतप्रधान असून त्यांचा मुलगा ‘समर प्रताप सिंह’ (सैफ अली खान) त्यांची हत्या करतो. त्यानंतर पंतप्रधानांच्या खुर्चीच्या शर्यतीमध्ये पक्षांतर्गत अत्यंत घाणेरडे आणि खालच्या थराला नेणारे राजकारण दाखवले आहे. या माध्यमातून एक प्रकारे भाजपविरोधी चित्रही उभे करण्यात आल्याचा स्पष्ट संकेत अनेक वेळा मिळतो. यातून दिग्दर्शक आणि निर्माता यांना षड्यंत्र सुचवायचे आहे का ? असा पुसटचा विचारही ‘तांडव’ पहातांना येऊन जातो.
८. हत्यारा असलेला उजव्या विचारसरणीचा पक्ष !
सत्ताधारी पक्षातील हीन राजकारणासह समांतररित्या विवेकानंद विश्वविद्यालयात विद्यार्थी संघटनांमधील निवडणुकीच्या घडामोडी चित्रित करण्यात आल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी पक्ष ‘जन लोक दल’ राजकीय लाभ उठवण्यासाठी डावी विचारसरणी असलेल्या तीन विद्यार्थी नेत्यांच्या हत्या करवतो.
९. हिंदु संतांचा अश्लाघ्य अनादर !
हत्या करणारा किंवा सर्व हत्या घडवून आणणारा नट पापांपासून सुटका करून घेण्यासाठी आणि मन:शांती लाभण्यासाठी एका हिंदु संतांच्या दूरचित्रवाणीवरील मार्गदर्शनातून बोध घेत आहे, असे वेब सिरीजमधून वारंवार दाखवले आहे. हे हिंदु संतही अयोग्य शब्दांमध्ये किंवा दुहेरी अर्थ निघेल, अशा पद्धतीने बोलत असल्याचे चित्रित केले आहे. या माध्यमातून हिंदु संतांचा अनादरच करण्यात आला आहे, किंबहुना हिंदूंचे साधू-संत कसे नीच असतात, अशा प्रकारचा संदेशच या हिंदुद्वेष्ट्या सिरीजमधून देण्यात आला आहे.
१०. दलित आणि उच्च वर्णीय हिंदू यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न !
‘तांडव’च्या माध्यमातून हिंदूंमध्ये अजूनही जातीभेद असल्याचे काही प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. यामध्ये पंतप्रधान देवकीनंदन हे त्यांच्याच पक्षातील एका वरिष्ठ दलित नेत्याचा जातीवरून अपमान करतात. ‘उच्च वर्णीय हिंदु महिलेवर तिचा प्रियकर असलेला हा दलित नेता अत्याचार करत असून गेल्या शेकडो वर्षांत दलितांवर झालेल्या अत्याचारांचा तो सूड उगवत आहे’, अशा प्रकारची वाक्ये घेण्यात आली आहेत.
११. मुसलमानांचा उदोउदो नि ‘मुसलमान हे भारतात बळी चढतात’ अशा स्वरूपाचे चित्रण !
एका प्रसंगात इमरान हा ‘दशरथी राम’ असून अत्यंत चांगला असल्याचे शिवा शेखर म्हणत आहे. तसेच विश्वविद्यालयातील निवडणुकीत इमरान दुसर्या पक्षाचा नेता असूनही शिवा शेखरला मत देतो, असे दाखवून त्याची व्यापक विचारधारा दर्शवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.
अन्य एका प्रसंगात एक मुसलमान विद्यार्थी ‘आम्हाला भारतामध्ये कशा प्रकारे वागवले जाते, हे तुला ठाऊक आहेच !’, अशा प्रकारे शिवा शेखरशी संवाद करतांना स्वतःचे दु:ख व्यक्त करतो. अन्य एका प्रसंगात पोलीस अधिकारी एका मुसलमानाला उद्देशून ‘तुम्हाला तर अशा प्रकारची (गुन्हे घडवण्याची) सवय असेलच !’, असे म्हणत आहे. अन्य एका प्रसंगात ‘सना मीर’ आणि तिची बहीण यांना ‘किशन’ नावाचा भ्रष्ट पोलीस अधिकारी फसवत असल्याचे अन् दोघींकडून लाखो रुपये उकळत असल्याचे चित्रित केले आहे.
१२. ‘तांडव’ हे साम्यवादी शिवा शेखरच्या पक्षाचे नाव !
डाव्या विचारसरणीचा शिवा शेखर हा विश्वविद्यालयाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी ‘तांडव’ असे आपल्या नव्या पक्षाचे नाव ठेवतो. निवडणुकीत शिवा विजयी होतो, अशा प्रकारे दाखवले आहे.
एकूणच संपूर्ण वेब सिरीजमधून डाव्या विचारसरणीचा उदोउदो करण्यात आला आहे. उजव्या विचारसरणीचा राजकीय पक्ष किती नीच आहे, मुसलमान किती चांगले असतात, हिंदूंमधील कथित जातीद्वेष आदींचा पुरस्कार केला आहे. तसेच हिंदु-मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून मुसलमान साधे आणि चांगले असतात, अशा प्रकारे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ही वेब सिरीज हिंदुद्वेषी, राष्ट्रद्रोही नि समाजद्रोही असल्याचे स्पष्ट लक्षात येते. त्यामुळे प्रत्येक हिंदू अन् राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी या वेब सिरीजला वैध मार्गाने संघटित विरोध करण्याची आवश्यकता आहे.
– श्री. विक्रम डोंगरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१७.१.२०२१)