व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती चोरी होण्याची भीती असेल, तर ते भ्रमणभाषमधून काढून टाका ! – देहली उच्च न्यायालय

नवी देहली – जर तुम्हाला वाटते की, व्हॉट्सअ‍ॅप तुमची माहिती सुरक्षित ठेवू शकणार नाही, तर तुम्ही ते तुमच्या भ्रमणभाष संचामधून काढून टाका, असा सल्ला देहली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिला. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच नवीन गोपनीयता धोरण लागू करण्याचे घोषित केले होते. त्यानुसार वापरकर्त्याची सर्व माहिती व्हॉट्स अ‍ॅपकडे जाणार होती. याविरोधात अधिवक्ता मनोहर लाल यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. सरकारकडून यावर कोणतेही उत्तर न आल्याने त्यांनी देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. त्यावर न्यायालयाने वरील सल्ला दिला.

अधिवक्ता मनोहर लाल यांनी न्यायालयाकडे मागणी केली की, याविषयी कायदा असला पाहिजे.

(सौजन्य : GoNewsIndia)

त्यावर न्यायालयाने विचारले, ‘तुमची कोणती माहिती असुरक्षित आहे ?’ त्यावर अधिवक्ता मनोहर लाल म्हणाले, ‘सर्वच.’ त्यावर न्यायालयाने व्हॉट्स अ‍ॅप डिलीट करण्यास सांगितले, तसेच न्यायालयाने विचारले की, तुम्ही ‘गूगल मॅप्स’ वापरता का ? तेव्हा अधिवक्ता मनोहर लाल यांनी ‘हो’ म्हटल्यावर ‘गूगल मॅप’ही सर्व माहिती घेतो’, असे न्यायालयाने सांगितले.