७१ सहस्र कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पुण्यातील सहकारी बँकेवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह १४ पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद

अनिल भोसले

पुणे – येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेवर १५ जानेवारी या दिवशी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी (ईडी) मोठी धाड टाकली आहे. या अधिकोषात अनुमाने ७१ सहस्र कोटींचा घोटाळा झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून या अधिकोषाचे संचालक अनिल भोसले आणि रेश्मा भोसले यांच्यासह १४ पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (घोटाळ्यात सहभाग असणार्‍या अशा लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई अपेक्षित आहे ! तसेच घडणार्‍या गुन्ह्यांत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते सापडण्याचे प्रमाणे अधिक असल्याने गुन्हेगारांचा भरणा असलेला पक्ष असे नाव दिल्यास त्यात चूक काय ? – संपादक) पोलिसांनी भोसले यांच्या २ अलीशान गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच भोसले यांची ३२ कोटी रुपयांची एकूण मालमत्ता अधिगृहीत करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवला आहे.

या वेळी काही महत्त्वाची कागदपत्रेही अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी कह्यात घेतली आहेत. अधिकोषासोबतच अनिल भोसले यांच्या शिवाजीनगर येथील कार्यालयावरही धाडी टाकल्या आहेत. बँक घोटाळ्याची व्याप्ती ३५० ते ४०० कोटींच्या पुढे गेल्याने पुणे आर्थिक गुन्हे शाखेने ‘ईडी’ला कळवले होते. अधिकोषावर निर्बंध घातल्यानंतरही या प्रकरणातील आरोपींनी अधिकोषातून एकूण २ कोटी १४ लाख रुपये काढून घेतल्याचे तपासात समोर आले आहे.